श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये असते.


गुरुजी तालीम मंडळाचा गणपती

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा या मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते.


श्री तुळशीबाग गणपती

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या श्रींची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.


केसरी गणपती
केसरी संस्थेचा गणपती १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे.


पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेऊन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणार्‍या वाहनातून) मुठा नदीच्या तीरावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करुन उत्सवमूर्ती घेऊन परत जातात.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसर्‍या दिवशी मध्याह्नापर्यंत चालते. ही मिरवणूक पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू समजली जाते.

0 comments

Post a Comment