पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात -
विघ्न कंदना ।
या नाचत रमणी । जी जी जी ||
कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे -
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा ।
सर्वे ठायी वंदितो तुला |
यावे नाचत गौरीबाळा।
लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय-गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे -
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालं का न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैंजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.
0 comments
Post a Comment