गणपतीचे रूपभेद

भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तंत्र - या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.


* महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.

* हेरंब-गणपतीहेरंब-गणपती तंत्रसार ग्रंथात उल्लेखित आहे. हे रूप पंचानन (पाच तोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेले) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.

* नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.

* विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.

* बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो. तो द्बादशभूज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पाहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणा-या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात - आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी - गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

गणेश चतुर्थी
भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. यावर गणपतीने संतापून चंद्राला शाप दिला की, ''तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही.''

गणपतीचे अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.

गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लेखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते -

महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु
– द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलीयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात - गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -
वक्रतुण्ड – प्रथम अवतार. वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन. अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
विघ्नराज – विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचा उद्देश्य.
धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा. अभिमानासुराचा नाश केला.



0 comments

Post a Comment