हिरवा गार श्रावण सरून चैतन्याच्या लाटेवर आरुढ होऊन, उल्हासाचे रंग उधळीत भाद्रपद येतो. त्याच्या मंगल पावलांसाठी सृष्टी जणू अधीर झालेली असते. घरी दारी सजावट सुरु होते; तोरणे सजतात आणि वाजत गाजत मंगलमूर्तीचे आगमन होते.

दर वर्षी भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या मंगल दिवशी उत्साहाचा, आनंदाचा जल्लोष सुरु होतो. ''मंगलमूर्ती मोरया.. गणपती बाप्पा मोरया.." अशा गजरात शहरातील रस्ते फुलून जातात. मिरवणुकीत तल्लीन झालेले नागरिक आपल्या लाडक्या दैवताची प्रतिष्ठापना करतात.

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी विघ्नहर्ता गणेश. मुंबईतील सुमारे साडेपाच हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. सुमारे लाख दीड लाख घरगुती गणपती मोठ्या थाटामाटात घरोघरी विराजमान होतात आणि मुंबई - पुण्यासारख्या शहरांमधील लोकांचे अवघे जीवनच गणपती व्यापून टाकतो. पूजा, आरत्या, नैवद्याच्या तयारीत सर्व लोक रंगून जातात.

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता,
तूच कर्ता आणि करविता

अशी देवाची प्रार्थना करीत आकाशात नवरंग उधळीत आरत्यांचा गजर स्वर्गात पोचतो. पाण्याची टंचाई, दुष्काळाचे सावट स्वाईन फ्लूचा भयानक प्रादुर्भाव, ही संकटे वेढा घालून बसलेली असता त्यांची तमा बाळगता गणपतीच्या दर्शनाला लोक रांगा लावतात. स्वाईन फ्लूपासून बचाव व्हावा म्हणून मास्क घालणार्या पोलिसांचे ठिकठिकाणी दर्शन होते. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आदल्या रात्रीपासूनच भाविक गर्दी करतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. .. १८९३ मध्ये केशवजी नाईकांच्या चाळीत लोकमान्यांनी पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला आणि ती परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे हयाचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो. गणेशोत्सवामुळे लोकांची श्रध्दा अतूट झालेली दिसते. मुंबईत आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या वाढताना दिसते.

प्रभादेवीचा सिध्दीविनायक आणि गिरगावातील फडके मंदिर ही दोन्ही मंदिरे गर्दीने ओसंडून वाहत असतात. मुंबईत गणपतीची किती मंदिरे आहेत, याची यादी केली, तर भली मोठी नोंद होईल. केवळ गणपतीची मंदिरे नव्हे, तर प्रत्येक मंदिरात गणपती हा असतोच! सुवर्णालंकारांनी झगमगणार्या गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या लांबचलांब रांगा लागतात.

पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी श्री सिध्दिविनायकाची स्थापना केली आणि सारसबागेच्या सौंदर्याला पावित्र्याची किनार लाभली.

पेशवे घराण्यातील नानासाहेब, थोरले माधवराव, आणि अम्रुतराव हे तिघे गणपतीचे उपासक होते. शनिवारवाडयात गणपती पूजनाची, उत्सवाची, सुरुवात नानासाहेब पेशवे यांनी केली. तेव्हाचा गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात होत असे. पेशवाई संपुष्टात आल्यानंतर ओघानेच उत्सवाची प्रथा बंद पडली.

पेशवाईतील गणेशोत्सवाच्या राजवैभवाला पुढे १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी पुन्हा वैभव प्राप्त करुन दिले. मधल्या कालखंडात गणेशोत्सवाचे सार्वजनिक रुप नाहीसे झाले. तरी जनमानसातील गणेशाचे स्थान अढळच होते.

१९९६ मध्ये जगभरातील गणेशमूर्ती एक प्रदर्शन सोहळा या ठिकाणी झाला आणि एक गणेश संग्रहालय इथे निर्माण झाले. हे गणेश संग्रहालय म्हणजे गोविंदराव मदाने आणि पांडुरंग जोगे यांच्या छंदातून निर्माण झालेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे देऊळ होय. या ठिकाणी साडेतीनशेहून अधिक गणेशमूर्ती आहेत आणि .पां. आपटे यांनी निर्माण केलेली २३ गणेश चित्रांची सृष्टी अत्यंत प्रेक्षणीय आहे.

प्राचीन आणि अर्वाचीन गणेशमूर्ती येथे आहेत. अगदी तळहातावर ठेवता येईल एवढया गणेशापासून ते पुरुषभर उंचीच्या महागणपतीपर्यंत आकाराच्या मूर्ती आहेत. माती, दगड, काष्ठशिल्प, तांबे, पितळ, पंचधातू आणि चंदन, शिंपला, काच, कागद अशा असंख्य वस्तूंपासून साकारलेल्या मूर्तींचे विलोभनीय दर्शन येथे घडते. पुण्याच्या पेशवाईतील लंबोदरापासून ते मुस्लिम बहुल काबुलमधील काळयाभोर गणेशशिल्पाचा हा गणेश दर्शन सोहळा पाहताना अध्यात्माच्या पलीकडे, शास्त्र, मूर्तीविज्ञान, देशोदेशीच्या गणेश संकल्पना असे मोठे विश्व आपल्याला दर्शन देऊ लागते.

जपानमध्ये आजही गणेश हा लोकप्रिय देव आहे. आणि तेथे त्याची पूजा होते. तो सुखाचा, भाग्याचा देव समजला जातो. त्याच्या उजव्या हातात लाडू आणि डाव्या हातात मुळा असतो. "होजांझी", येथे द्विदेही गणेशाचे मंदिर आहे.

भारतापासून तब्बल आठ हजार किलो मिटर अंतरावर अटलांटिक महासागरात वसलेल्या आयर्लेंडनामक बेटावरही विघ्नहर्त्याचे दर्शन घडते हे आश्चर्यकारक नाही काय? येथे तब्बल २२ एकरांचा परिसर व्यापून राहिलेले उद्यान (ईंडियन स्कल्पचर्स पार्क) आहे. तेथील विस्तीर्ण हिरव्यागार मैदानावर अनेक गणेशमूर्ती मोठ्या चित्राकर्षक आहेत. काळ्या ग्रॅनाईण्टमध्ये कोरलेल्या सहा ते नऊ फूट उंचीच्या अशा नऊ मूर्ती या पार्कमध्ये आहेत. ग्रंथवाचक करणारा, वीणावादन, तबलावादन, बासरिइ वादन करणारा गणेश इथे भेटतो. एका मूर्तीमध्ये मूषक लॅपटॉप वापरतो आहे, तर एका मूर्तीमध्ये तो नागापुढे पुंगी वाजवत आहे. देशोदेशीच्या अशा गणेशमूर्ती पाहून आपण गणेशाच्या ॐकार स्वरुपात दंग होऊन जातो आणि सर्वांना सुख लाभावे अशीच प्रार्थना करतो.

मंगलमूर्ती मोरया|
गणपतीबाप्पा मोरया

0 comments

Post a Comment