आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणेशाचे पिता असलेल्या शिवशंकराचे सोळा सोमवारचे व्रत गणपतीची स्थापना झाल्यावरच संपन्न होते. एवढेच नाही तर कलियुगातील श्री सत्यनारायण व्रत कथा महापूजेच्या सुरवातीला विनायकाची पूजा केली जाते. गणपतीचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे तो विघ्न विनाशक आहे. आजचे जग सौंदर्याच्या मागे धावणारे आहे. गणपती त्यात कुठेही बसणारा नाही. हत्तीचे तोंड घेऊन उंदरावर जाणारा तुंदीलतनू तरीही आपला वाटतो. त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे. अशी ही मंगलमूर्ती विघ्नविनाशक आहे. त्याचे तोंड वाकडे असल्यामुळे तो वक्रतुंड आहे. पोट मोठे असल्यामुळे लंबोदर आहे. एक दात असल्यामुळे तो एकदंत आहे.
गणेशाचे येणे शुभ मानले जाते. या दिवसातील वातावरण उत्साहाचे असते. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. सर्व देवता फूलांनी प्रसन्न होतात तेथे गजानन दुर्वा आणि केवड्याने प्रसन्न होतात. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक आणि लाडू आहेत. चतुर्थीच्या दिवशी उपवास करणार्या भक्तांनी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडणे वर्ज्य मानले जाते.
चतुर्थीचे एकवीस निरंकार व्रत ठेवल्यास एकवीस मोदक तयार केले जातात. त्यापैकी वीस गोड आणि एक खारट असतो. दिवसभर उपावास केल्यावर संध्याकाळी हे मोदक खाऊन उपवास सोडला जातो. मोदक खाता खाता जेव्हा मिठाचा मोदक खाल्ला जाईल तेव्हाच पाणी पिऊन उरलेले मोदक तसेच सोडून द्यावे लागतात. कधी कधी पहिलाच मोदक मिठाचा लागू शकतो. अशा प्रकारे या ओंकार स्वरूपाचे कठीण व्रत आहे.
खरोखरच अशा विलोभनीय विनायकाचे दहा दिवसानंतर विसर्जन होताना मन उदास होते. आजही गणपती काही कुटूंबात गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीबरोबर गुळ-तांदूळ आणि दुध-पोह्यांची शिदोरी देण्याची परंपरा आहे. कारण ते आपल्यापासून कितीही दिवस दूर राहीले तरी उपाशी राहू नयेत हा उद्देश असतो. विसर्जनानंतर वाटल्या डाळीचा प्रसाद वाटण्याची प्रथा सुद्धा आहे. 'गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या' या वचनाप्रमाणे ते पुन्हा एकदा आपल्यात वाजत गाजत आले आहेत. आपण त्यांची मनोभावाने पू्जा करा आणि त्याला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा.
0 comments
Post a Comment