"काय चाल्लेय?", सॅवियोने करणला विचारलं. गेली बराच वेळ करण कॉंप्युटरवर बसून काहीतरी करत होता.
"माझी मेनका-द-ड्रिमगल.कॉम साईट अपडेट करतोय. परवा तिच्या आगामी चित्रपटाचे ‘इधर उधर’चे फोटोज मिळाले ते अपलोड करतोय. हे बघ!"सॅवियो तिचे फोटो बघायला, भुकेला सिंह ज्या उत्साहाने कोऱ्या गवताकडे बघेल, तेवढ्या उत्साहात पुढे सरसावला. सॅवियोला मेनकात बिलकुल रस नव्हता. समीरदादा सांगतो तशी त्याला ती थोडी थोराडच वाटायची. भरपूर मेक-अप करून अन फोटो इफ्फेक्ट्स वापरून वय कमी करणे हे काही अशक्य नव्हते. पण हे सगळं करणच्या समोर बोलून दाखवण्याइतका तो काही मूर्ख नव्हता.
"छान आहे!", सॅवियो फोटोतली दूसरी हिरोईन मालविका कडे बघून म्हणाला. करणने कॉंम्प्युटरवर सॅवियोच्यासमोर उत्तान मालविकाला फोटोतून खोडलं अन मेनकाची इमेज साईटवर अपलोड केली.
"परवा बॉलीवूडब्लॉग्स वर गेलेलो, तिकडे मेनकाचा फॅन क्लब आहे. तिथे मला आज सेप्शल गेस्ट म्हणून ऑनलाईन चॅटवर बोलावलंय. मी इतर नवशिक्या मेनका फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे." करण दिमाखात म्हणाला.
"अरे पण सायन्स होमवर्क! सोलंकी मिस पट़्ट्या मारते रे होमवर्क नसेल तर!"
"माझा झालाय!"
"अरे मग इतका वेळ सांगितलं का नाहीस?"
"तू विचारलंस का?"
"तुझा होमवर्क झाला ह्याचं काय मला स्वप्न पडणार होतं? ठिक आहे. दे मग टेक्स्ट बुक. मी छापतो."
""नाहिये!"
"का? कुठे आहे?"
"एका मित्राला दिलीय."
"कुणाला?"
"आहे एक वर्गातला मित्र."
"कोण विनोद? हेतन? दानिश शाह? "
"नाही! वेगळंच कुणीतरी!"
सॅवियो गोंधळला पण थोड्या वेळातच काहीतरी समजल्यागत डोळे मिचकावत म्हणाला, "मित्र? हं? की मैत्रीण! प्प.प्प...पूजा प्रधान ना? काय?"करण ओशाळला. त्याच्या गोऱ्या गालावर लाली चढली.
"कधी आलेली? काय बोलली? सांगना!"
"दुपारी आलेली. काही विशेष नाही. सायन्स होमवर्क केला का म्हणून विचारत होती. मी दिला!"
"काय दिलं? आणखी काय म्हणाली?", सॅवियो उत्साहात होता.
"मी दिला, सायन्स, मॅथ्स आणि मराठीचा होमवर्क! म्हणाली थॅन्क्स. रात्री परत देईन म्हणून."
"ले बिड्डू!! म्हणजे रात्री पुन्हा गुटर्गू आहे! काश मै भी मेरा होमवर्क टाईमपे करता तो मेरे भी घर लडकियां आतीं और कहतीं..."
"भैया!", करणने सॅवियोची जन्नत-ट्रीप तोडली, "होमवर्क बाकी है भैया!"
वियो त्रागा करत उठला, दरवाज्याशी जाऊन, "उद्या भेटूया! रात्री काय काय झालं ते सांग तेव्हा!" असं म्हणून निघून गेला. सॅवियो नाहीये तर करणला पुढचे काही तास शांतता मिळणार होती. समीर अजून ऑफिस मधून आला नव्हता. सुट़्टीवर आला असताना समीरदादा, मनोहर मामांना कामात मदत करायला म्हणून त्यांच्या ऑफिसात जाई. "मोहिते फायनान्स कन्सल्टण्ट" चे हेड "मनोहर मोहिते" हे आईचे चुलते. आता समीर नाहीये म्हणजे घरी शांतता होणारच होती. तिकडे आई किचनमध्ये बिझी.
करणने बॉलीवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. "क्रेझीकरन"(!) ह्या नावाने प्रोफाईल बनवला. पाच दहा मेनका फॅन्स आधीच लॉगिन झाले होते. ग्रुप चॅट सुरू झाला.
ऍडमिनिस्ट्रेटर: वेल्कम टू द बिग्गेस्ट मेनका फॅन एव्हर! करन! ही इज अवर क्रेझीकरन!!!
क्रेझीकरन: हाय फ्रेण्ड्स!
वैशाली२००२: हाय क्रेझीकरन. तू मेनकाचा फॅन कधीपासून झालास?
क्रेझीकरन: लहान असल्यापासून. आई म्हणते की मी एक दोन वर्षांचा असेन तेव्हापासूनच तिचे पोस्टर बघून बोट दाखवायचो. गाण्यांवर डांस करायचो. टि.व्ही. वर तिचे पिक्चर लागले की तीन तीन तास टि.व्ही.समोर बसून रहायचो. हलायचो नाही.
वैशाली२००२: हाऊ नाईस!!
कूल-आनंद: मेनकाचे काय फिचर्स तुला आवडतात?
क्रेझीकरन: सगळेच. तिचे डोळे, ओठ, आवाज. तिचा केस फिरवण्याचा अंदाज. डांस, ऍक्टींग सगळच!
कूल-आनंद: बूब्स, बट़्ट?
क्रेझीकरन: हाहा! बी सिरियस! त्यापेक्षाही बरंच काही चांगलं आहे तिच्याकडे
गुजरातीज-रॉक: शी इज गुजराती ना?
क्रेझीकरन: हो! तिच्या आईकडून. तिचे बाबा मराठी आहेत.
गुजरातीज-रॉक: म्हणजे हाफ-गुजराती? ओह नो!
वैशाली२००२: पण मी एकलं की तिचे बाबा नंतर त्यांना सोडून गेले म्हणे!
क्रेझीकरन: हो खरंय ते! तिथूनच तर तिने स्वतः घराचा भार उचलला. सुरूवातीचे फ्लॉप चित्रपट तिने पैसा मिळावा यासाठीच केले.
फझ्झीफ़ातिमा: हो तिचा तो पहिला पिक्चर लवबर्ड्स! फ्लॉप!
क्रेझीकरन: अगं असं नको बोलूस! त्यातला तो आत्महत्येचा सीन आठवतोय? त्या परफॉर्मन्स मध्ये कित्ती परिपक्वता होती.
केशवकमल: मला तर तिचा पहिला हीट "ममता" आठवतो!
क्रेझीकरन: येस इंडिड! त्यात आपल्या बाळाला सोडून युद्धावर जाणारी आई कित्ती छान रंगवली आहे तिने. असं वाटत होतं की ती त्या बाळाची खरी आई असावी.
फझ्झीफ़ातिमा: पण त्यानंतर तिने एवढे सशक्त रोल्स केले नाहीत, ग्लॅमरसच राहिली.
क्रेझीकरन: तू तिचा तमिळ "कालक्षणम" विसरलीस. कॅन्सरग्रस्त मुलीची व्यक्तिरेखा कित्ती छान केली तिने. लोकं तर त्या चित्रपटाला तमिळमधला "आनंद" म्हणत होती.
फझ्झीफ़ातिमा: दॅट्स ट्रू!
ब्लॅकवल्चर: पण तिच्या खाजगी आयुष्याविषयी तुला किती माहित आहे?
क्रेझीकरन: मला नीट कळलं नाही?
ब्लॅकवल्चर: तिच्या खाजगीतल्या गोष्टी. म्हणजे तू तिला तिचा फॅन म्हणवतोस. तुला तिची काही गुपितं माहित असतीलच!
क्रेझीकरन: गुपितं! म्हणजे काय विचारायचे ते नीट विचार.
ब्लॅकवल्चर: ओके. मग तिचा पहिला चित्रपट कुठला?
गुजरातीज-रॉक: सगळ्यांना महितीये. लव्ह्बर्ड्स!
क्रेझीकरन: नाही. एक मिनिट. तिचा पहिला चित्रपट आहे "तूफान". पण तो लव्हबर्ड्सच्या नंतर रिलीज झाला.
ब्लॅकवल्चर: छान! आता सांग तिचं शिक्षण किती अन कुठे झालं?
क्रेझीकरन: बडोद्यात. न्यू नरसी स्कूल शाळा, सेण्ट पायस कॉलेज. बी.ए.
ब्लॅकवल्चर: उत्तम! तिचा पहिलं अफेयर?
क्रेझीकरन: अनुज कुमारच! "ममता" पासून!
ब्लॅकवल्चर: नाही, म्हणजे फिल्मी बिझिनेस च्या बाहेर!
क्रेझीकरन: असं ऎकलं आहे की तिचा तिच्या कॉलेजात बॉयफ्रेन्ड होता.
ब्लॅकवल्चर: हो, गौतम दोशी! तो आता अमेरीकेत एका मल्टीनॅशनल फार्मस्युटीकल कंपनीचा हेड आहे.
क्रेझीकरन: ग्रेट! तुला त्याचं नावही माहितीये?
ब्लॅकवल्चर: तिच्या वयाच्या २३ वर्षापर्यंत तो तिच्या सोबत होता. नंतर सोडून गेला.
क्रेझीकरन: ओके. दॅट्स सॅड!
ब्लॅकवल्चर: का सोडून गेला माहितीये?
क्रेझीकरन: नाही. का?
ब्लॅकवल्चर: तिचं दुसऱ्याशी अफेयर होतं!
ती प्रेगनण्ट राहिली होती त्या दुसऱ्याकडून!
करण चमकला...
क्रेझीकरन: व्हॉट रब्बीश!!!
ब्लॅकवल्चर: एवढंच नाही तर तिनं अबॉर्शन न करवता ते मूल जन्माला घातलं अन सोडून दिलं.
करण अस्वस्थ झाला. हे नवीनच होतं.
क्रेझीकरन: आय डोण्ट बिलीव्ह धिस? एनी प्रूफ!
ब्लॅकवल्चर: प्रूफ! अरे हाडामासाचा तिचा मुलगा असताना प्रूफ कशाला पाहिजे? मीच आहे तो! तिचा टाकलेला मुलगा. चांडाळणीने मला वाळीत टाकून दिले. दॅट स्लटी बिच्च!!!
करणचे हात थरथरू लागले. हे अनपेक्षित होतं. काय करावे हे न सुचल्याने करणने ताबडतोब स्पॅमर दाबला अन ब्लॅकवल्चरला ब्लॉक केले. त्याचं डोकं भणाणत होतं. काही वेळ तो असाच तो मॉनिटरकडे पाहत होता. त्याच्या सगळ्या संवेदना मंद पडल्या होत्या. चॅट रूममधले इतर फॅन्स ब्लॅकवल्चर ला शिव्या घालत होते. पण आधीच करणने ब्लॉक केल्याने ब्लॅकवल्चर निपचित होता
थोड्यावेळातच ऍडमिनिस्ट्रेटरने त्याला चॅटरूम बाहेर हाकलले. तो लॉग आऊट झाला.
त्याच्या नावापुढचा कर्सर आता नुसतीच उघडझाप करीत होता.
"हाऊ डेयर ही!", करण रागाने शहारला होता, "मेनकाच्या खाजगी आयुष्यावर कसा कुणी असा गलिच्छ आरोप करू शकतो? नक्कीच हा कुणीतरी माथेफिरू आहे...", त्याचं मन सांगत होतं, "पण त्याला तिच्या जुन्या बॉयफ्रेण्डच नाव गाव माहित होतं!", एक दुसरा विचार बोलू लागला, "खरंच जर त्याला हे माहित असेल तर....?"
नसत्या शंकानी त्याच्या मनात कल्लोळ माजवला होता. त्याचं दैवत लांच्छनी लागलं होतं. रागात त्याच्या मुठी आवळत होत्या.
रागाच्या भरात त्याला दारवरची टकटकही ऎकू आली नव्हती.
"हाय!", नेहेमीचा परिचित आवाज पुन्हा ऎकू आला, "मी आत येऊ का?".
करणने धीर धरला अन स्वतःला सावरून तो म्हणाला, "या प्लीज कम ईन!"
दार हललं अन एक प्रसन्न चेहेरा आत शिरला, पूजा प्रधानचा.
"थॅन्क्स! तुझा होमवर्क चांगला होता! बरीच मदत झाली.", पूजा करणला त्याच्या वह्या सोपवत म्हणाली. करण पेक्षा थोडी बुटकी पण फिकट निळ्या सलवार अन जीन्स मध्ये जणू एखादी बाहुलीच वाटावी. तांबटभोर केस. गोल गोरा चेहेरा. पिंगट डोळे अन गुलाबी ओठ. चेहेऱ्यावर नेहेमीची प्रसन्नता. आवाजात नेहेमीचा गोडवा. स्वभावात नेहेमीची शालीनता.
करणसारख्याला पूजा प्रधान सारखी मुलगी भाव देते ह्याचं करणच्या मित्रमंडळींना उगीच अप्रूप वाटत नव्हतं.
"थॅन्क्स!", करण उभा राहत म्हणाला, "आय मिन वेलकम... ऍण्ड थॅन्क्स टू!"
पूजा थोडक्यात हसली. "मी निघते!", पूजा म्हणाली अन जायला वळली.
"का?" ऎवजी "ओके!" असा करणच्या तोंडून शब्द पडला. करण आणखी शब्दांची जमवाजमव करणार तोच पूजा मागे वळली. बोलायच्या आवेशातलं करणचं तोंड दोन मिनिटं उघडंच राहिलं...
"वन अपॉन साईन हा कोसाईन असतो. तुझ्या दहाव्या गणितात कोसेक लिहिलास तू. ते चुकलंय म्हणजे. नंतर करेक्ट कर!", पूजा म्हणाली.तिच्या पिंगट डोळ्यांत पाहत करण गुंगच झाला. गणिताच्या गोष्टीही तिच्या तोंडून गोड वाटत होत्या.
"ओके वेलकम! (की ‘थॅन्क्स’!?)", गोंधळून करणने म्हटले. अजूनही सही शब्दांची जुळवाजुळव होत नव्हती. मेंदूचा तोंडाशी संपर्क जणू तुटल्यातच जमा होता. करणचा मेंदू, त्याचे पूजाला पाहणारे डॊळे अन तिला ऎकणारे कान, हेच सांभाळण्यात जास्त बिझी असावा!
"बाय. गुड नाईट!", तिनं मधाळ आवाजात निरोप दिला.
"बाय!" करणने हात हलवला, "हॅव स्वीट ड्रीम्स!"...
अचानक आपण तिला "स्वीट ड्रीम्स!" म्हटल्याचे जाणवून करण लाजला. आज पहिल्यांदाच करणने तीन शब्दांचं वाक्य व्याकरणासहीत तिच्याशी नीट म्हटलं होतं.
तिनेही त्यावर हसून दाद दिली अन रातराणीच्या फुलांच्या सुगंधासारखी ती करणच्या संवेदना दरवळून निघून गेली.
हा सुगंध समीर येईपर्यंत दरवळत होता....
*******************
Contd..
0 comments
Post a Comment