समज आणि गैरसमज...

राजची आणि माझी ओळख नव्हती त्या काळात मला राज हा अतिशय उद्धट आणि अतिआक्रमक वाटायचा. त्याची माझी मूळ ओळख उदय तानपाठक नावाच्या आमच्या एका मित्राने करून दिली. तो एका सकाळी मला राजकडे घेऊन गेला. ती भेट सकाळी फार लवकर ठरल्याने माझ्या डोळ्यांवर फार झोप होती. मी एकाच गोष्टीमुळे राजच्या भेटीबाबात प्रतिकूल होतो. त्या भेटीत राजने हिंदुत्वाबाबत आपली मतं मांडल्याचं मला आता स्मरतं. राज तेव्हा मला म्हणाला होता, ‘‘हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे. पण खरं तर महाराष्ट्रात मराठी माणूस, गुजराती आणि मारवाडी-जैन माणूस मिळून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायला हवा. शिवाय मराठी माणूस म्हटलं की, खेड-मालेगावचा मुसलमान नाही तर वसईचा ख्रिश्चन तुम्ही कसा वगळणार?’’ मी ते ऐकून चाट पडलो. राजची प्रतिमा तेव्हा प्रतिबाळासाहेब अशी होती. मला वाटलं होतं तो त्या पद्धतीने बोलेल पण ऐकलं ते हे. नंतर अलीकडे एकदा बोलतानासुद्धा तो म्हणाला, ‘‘आपली ज्या प्रकारची तपश्चर्या असते, त्याच प्रकारचं आपण बोलावं. म्हणजे त्यावर आपला विश्वास बसतो आणि लोकांचाही. आमच्या आजोबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलत. बाळासाहेबांची ज्या प्रकारची तपश्चर्या होती, ते त्या प्रकारचं बोलले. मी तेच बोलतो ज्यावर माझा विश्वास आहे. उगाच बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्‌स ऐकून हिंदुत्वावर बोलण्याने माणसाचा विदूषक होईल. तपश्चर्येशिवायचे इशारे म्हणजे साबणाचे फुगे! मला ते उडवायचे नाहीत.’’ राज विचार करतो तो असा.

पहिल्या भल्या सकाळच्या भेटीनंतर त्याची अन्‌ माझी मैत्री झाली असं नाही. गंमत म्हणजे राजच्या अगोदरपासून माझी आणि उद्धवची ओळख होती. राजच्या संदर्भात जो उद्धव येतो तेवढंच या ठिकाणी लिहिणं अपरिहार्य. उद्धवच्या बाजूने राज आणि राजच्या बाजूने उद्धव जेवढा मला कळला, त्यातून मला जे आकलन झाले ते तसं क्लेशदायक होतं. इथे उद्धव किंवा राजच्या राजकारणाचं मूल्यमापन मी करत नाहीए. दोघांनाही त्यांचं राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते करण्याचा व ते करताना डावं-उजवं न पाहण्याची दोघांनाही मुभा आहे. परंतु राजच्या बाबतीत जे झालं ते नि:संदिग्धपणे अन्यायकारक होतं. कारण शिवसेनेमध्ये राजची राजकारणाची समज त्यांच्या पिढीतली सर्वात अव्वल समज होती. त्याच्यामध्ये सर्व काही मंगल करण्याची स्वप्नं होती. त्याच्याकडे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे तरुण होते. त्याची मागणी ही कामाच्या, जबाबदार्‍यांच्या वाटपाची होती. याचं उत्तर ‘तुझ्यासाठी सर्व महाराष्ट्र खुला आहे’ हे असू शकत नव्हतं. (अर्थात या उत्तराच्या शेवटी त्याने योग्य तो बोध घेतलाच!) वास्तवात जे होत होतं, त्याची सामान्य जनतेला योग्य ती कल्पना नाहीए. मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेलं एक उदाहरण लिहितो. राज शिवसेनेत प्रचंड लोकप्रिय होता. तो जिथे जात असे, तिथे त्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चोरून-चोरून भेटायला येत असत. मी ‘चोरून चोरून’ असं लिहिलं आहे त्याचं उदाहरण एकदा मला पाहायलाच मिळालं. त्या अगोदर या सार्‍यांना राजला भेटायचं असेल, तर चोरून भेटावं लागतं असं मी ऐकलेलं होतं. पण माझा त्या कथांवर विश्वास नव्हता. पण एकदा पुण्यात राज असताना असेच शिवसेनेचे काही पदाधिकारी त्याला (चोरून) भेटायला येत होते. इतक्यात पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले रवींद्र मिर्लेकर राजला भेटायला ‘अधिकृत’ पणे येत आहेत अशी बातमी आली. तेव्हा आपापल्या भेटी गुंडाळून तत्कालीन शिवसेना पदाधिकारी मिटिंग आवरून अक्षरश: राजच्या घरातून पळून गेले! त्यांना म्हणे, त्यांच्या नावाची यादी ‘मातोश्री’वर सादर होईल अशी भीती होती! त्या वेळीही त्यांच्यावर राजचं म्हणणं गमतीशीर होतं, तो म्हणायचा, ‘‘पदांवर बेतलं तर उड्या टाकून पळून जाणार्‍यांच्या जीवावर महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार? उद्या महाराष्ट्रावर संकट आलं, तरीही हे उड्या टाकूनच पळणार. वेळ कोणतीही असली, तरी पाय रोवून उभे राहतील असे पाच लोकसुद्धा महाराष्ट्राचं भलं करतील!’’ गंमत म्हणजे, त्या उड्या टाकण्याच्या प्रसंगात शिवसेनेच्या एकाच पदाधिकार्‍याने उडी टाकली नव्हती. ते म्हणजे शिवसेनेचे तत्कालीन आमदार दीपक पायगुडे! मला वाटतं, आपलं आपलं राजकारण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आपण मान्य केला, तरीही क्षुद्र आणि स्वार्थी माणसांच्या सल्ल्यावरून राजची जी मानखंडना होत होती ती खचितच समर्थनीय नव्हती. या काळात सुभाष देसाई हे शिवसेनेच्या पहिल्या वर्तुळाचे नाना फडणवीस होते. या काळात राजची जी मानसिक घालमेल होत होती, ती पराकोटीची त्रासदायक होती. आपण काही निर्णायक पाऊल उचललं तर बाळासाहेबांना जो त्रास होईल तो एकीकडे आणि एका कर्तृत्ववान पुरुषाला संघटनेतल्या पाच हजारो मनसबदारांकडून जी मानखंडना करून घ्यावी लागत होती ती दुसरीकडे. या कात्रीत राज सापडला होता. पिंजर्‍यात सापडलेल्या वाघासारखा राज तडफडत असे. मी स्वत: त्याच्यासोबत अशा अनेक संध्याकाळी बोलत काढलेल्या आहेत. ‘पिंजर्‍यामध्ये वाघ सापडे, बायका-पोरे मारिती खडे’ म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकच तेव्हा शिवसेनेने उभे केले होते. फरक एवढाच होता की, इथे पिंजरा बाळासाहेबांच्या प्रेमाचा होता. तो नंतर राजने तोडला. पण ते खूप नंतर. अगदी भिंतीला पाठ टेकल्यावर. त्या अगोदर खूप रामायण घडलं. त्यातल्या प्रत्येक नाही, तरी बर्‍याच घटनांचा मी साक्षीदार आहे. एवढं मात्र खरं की, राज त्या काळात खूप प्रतिष्ठेने आणि संयमाने वागला

राज : कल्पनेतला आणि खरा...

हे सगळं घडायच्या आधी मी राजची एक मुलाखत घेतली होती. ती घेत असताना मी राजसोबत कम्फर्टेबल नव्हतो. बहुदा तोही नसावा. मला सतत असं वाटत होतं की, मी जाणीवपूर्वक समोरच्याला अडचणीत आणण्याकडे कल असणारा मुलाखतकार आहे असा त्याचा कुणीतरी समज करून दिला होता. तो सतत प्रश्न कापून उत्तर देण्यावर भर देत बोलत होता. त्याअगोदर किणी प्रकरणामध्ये त्याच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले होते, संपूर्ण समाजवादी कंपू कुणाला तरी नष्ट करण्यात नेहमीच आनंद व उत्सव मानतो, तशाच प्रकारे सर्व तयारीनिशी त्या प्रकरणात उतरला होता. त्या समाजवादी आरोपांवर व्यक्तिश: माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींवर जादू करणार्‍या या तापट आणि आक्रमक नेत्यावर त्या प्रकरणाचा एवढा धुरळा का उडाला याचा शोध घ्यावा असे मला सातत्याने वाटत होते. खूप मागोवा घेतल्यावर हाती जे लागलं ते हेच होतं की, अशा प्रकारच्या षड्‌यंत्रात गोवण्यासाठी व राजची प्रतिमा मलीन करण्याचा कट खूप अगोदरपासून चालू होता. फक्त जोडण्याकरता योग्य ते प्रकरण हाताशी लागत नव्हतं. वास्तविक या प्रकरणाचं जे काही होतं, ते आणि राजच्या वर्तुळाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही त्या काळात समाजवादी पत्रकारांनी राजला त्याच्या प्रत्यक्ष शत्रूंपेक्षाही मानखंडित केलं. प्रत्यक्ष पुराव्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी हे संपूर्ण प्रकरण आधारहीन असल्याचे निष्कर्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे देऊनही, त्या काळात राजला, त्याच्या कुटुंबीयांना अपरिमित त्रास सोसावा लागला. मला असं वाटतं की, या षड्‌यंत्रात अशा रीतीने फसावं असे काही दोष राजमध्ये आहेत. हे अर्थात मला नंतर कळलं. तो माणसांवर चटकन विश्वास टाकतो. नको इतका विश्वास टाकतो. कुणी आपलं वाईट करेल यावर त्याचा विश्वासच नसतो. त्याचं इतक्या जणांनी, इतक्या वेळेला, इतकं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कल्पना म्हणून आपण त्या जागी असण्याची मला प्रचंड भीतीच वाटते. तरी हे पचवून राज माणूसवेडा राहिला आहे. एखाद्या किंवा कुणाही माणसावर दुसर्‍या भेटीतच संपूर्ण विश्वास टाकणारा राज हा भारतातला एकमेव राजकीय नेता असावा! याचा अर्थ तो चतुर नाही असं नव्हे, तो प्रसंगी अतिचतुरतेने वागतो. मुख्य म्हणजे तो कोणतीच गोष्ट कधीच विसरत नाही. तुमची एखादी बारीकशी हालचाल, उद्‌गार किंवा युक्तिवाद त्याच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. जेव्हा वेळ येते, तेव्हा तो ते आपल्या पोतडीतून बाहेर काढून त्याचा वापर करतो. अगदी जवळून पाह्यलेलं असल्याने मी हे सांगू शकतो की, याबाबतीत त्याची तुलना शरद पवारांशीच करावी लागेल. फक्त्त फरक एकच. पवारसाहेबांनी छोट्या माणसांची नावं आणि मोठ्या माणसांची कामं लक्षात ठेवली असं इतिहास सांगतो. राज नेमकं उलटं करतो. अनेक छोट्या माणसांच्या कसल्या कसल्या कामांसाठी राजने कुणाकुणाला फोन केल्याचं मी पाह्यलंय. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी राजकडे माणसं उभी असतात आणि राज स्वत: फोन करून नंतर काम झाल्याची खात्री करून घेतोय हे दृश्य मी दरवर्षी पाहत आलोय. गंमत म्हणजे इतर सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि नेत्यांची मुलं त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणि देशात असताना यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी राजकडे येतात आणि ती कामं करून घेतात. इथे नावं लिहिणं किंवा त्यांची कामं संयुक्तिक नसल्याने मी ती लिहीत नाही. नाहीतर ती यादी आणि कामं वाचून बर्‍याच जणांना चक्कर आली असती.

0 comments

Post a Comment