मिस्टर राज ठाकरे व्हॉट्स रॉंग विथ यू? असा प्रश्न तुम्हाला सगळे चॅनल्स आणि हिंदी-इंग्रजी पत्रकार विचारताहेत. गेले काही दिवस हाच प्रश्न वेगवेगळया प्रकारे तुमच्या पुढयात येऊन पडतो आहे. तुमचं त्यावरचं उत्तर?
राज : नथिंग इज रॉंग (हसतात). काही रॉंग नाही. चाललंय ते बरं चाललंय. ज्यांना वाटतंय की रॉंग चाललंय त्यांनी आपले कान आणि डोळे तपासून घ्यावेत. हे जे हिंदी भाषिक पत्रकार, हिंदी चॅनल्स माझ्याबद्दल-महाराष्ट्राबद्दल बोलताहेत ते मुळात पत्रकार आहेत का?
पण ते ओरडून ओरडून तुम्हाल गुंड म्हणताहेत...
राज : त्यांच्या ओरड्याने मी थोडाच गुंड ठरतो? आणि ह्यांच्या दादागिरीला दाबणं ही गुंडगिरी असेल, तर ही गुंडगिरी मला मान्य आहे.
पण मख्य प्रश्न बाजूलाच राहिलाय?
राज : तो काय?
हिंदी भाषिक पत्रकार -
राज : (तोडत) हे जे, ज्यांना तुम्ही पत्रकार म्हणताय ते पत्रकारितेचे साधे निकषसुद्धा पाळत नाहीएत.
पण -
राज : (तोडत) माझं पूर्ण करू दे मला आधी. तेच नेमकं करतात ते. पूर्ण बोलूच देत नाहीत आमच्या लोकांना. त्यांच्या अडचणीचा मुद्दा आला की माईक बंद. पुन्हा हेच फिर्यादी आणि हेच न्यायाधीश. म्हणे, ’राज के गुंडो ने हमला किया.’ मुळात पहिली गोष्ट म्हणजे ह्या हिंदी भाषिक पत्रकारांनी पत्रकारिता गुंडाळून ठेवलीय आणि हे स्वतः हिंदी भाषिक प्रांतवादी झालेत, विशेष करून यु.पी. -बिहारवाले. या अ‘‘या प्रकरणामध्ये हे असेच वागताहेत, हे मला शिकवणार वरती ! मी उत्तर प्रदेश, बिहारवर बोललो म्हणून !
पण का असं ? त्यांची काही दुश्मनी आहे का तुमच्याशी ?
राज : होय. आहे. मी महाराष्ट्र, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणसाबद्दल बोलतो ना ... त्यामुळे मी त्यांच्या मध्ये येतो.
पण त्याने काय होतं ?
राज : अहो, काय होतं काय? त्यांना उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नोकर्या का नाही मिळाल्या? इतका पुळका आहे नं, यांना उत्तर प्रदेश-बिहारचा...
त्याचा इथे ....
राज : (तोडत) ऐका. महाराष्ट्र जो काही घडलेला आहे, तो महाराष्ट्रीय, मराठी माणसाच्या शिस्तप्रियतेतून, सहिष्णुतेतून, उदारमतवादीपणातून. मुंबईच्या मोठेपणात मराठी माणसाबरोबर कुणाचा हात असेल, तर तो पारशी समाजाचा, गुजराती माणसाचा, मारवाडी समाजाचा, काही प्रमाणात सरदारजी-पंजाब्यांचा. पण या यु.पी.-बिहारवाल्यांना मुंबईतून वरण,भात, तूप, पोळी पाहिजे आणि वर हे मुंबईत मराठी माणसावर दादागिरी करणार... त्यांचा महाराष्ट्रावर राग आहे याचं कारण यांचा छुपा अजेंडा आहे. मुलायमसिंह आल्यावर घोषणा दिल्या गेल्या... ‘उत्तर प्रदेश तो झॉंकी है, अभी महाराष्ट्र बाकी है ! ‘
पण बिचार्या टॅक्सीवाल्यांना, भेळपुरीवाल्यांना धोपटून काय होणार ?
राज : एखाद्या भैय्या टॅक्सीवाल्याला एकटे भेटा तुम्ही. काय अनुभव येतो तुम्हाला ? एखाद्या मच्छीवाल्याला एकेकटे भेटता, तेव्हा काय अनुभव येतो तुम्हाला ? भैय्या पत्रकाराला तर आपणच दिल्ली चालवतो असं वाटत असतं. ही दादागिरी त्यांना मुंबईत चालवायचीय. मी ती चालू देणार नाही. छठपूजा करतात, दादर चौपाटीवर जातात, उत्तर प्रदेश दिन साजरे करतात, तेव्हा हा बिचारा पानवाला, बिचारा टॅक्सीवाला, बिचारा मच्छीवालाच जातो ना ? हा बिचारा नंतर राहत नाही. सिनेमात दाखवतात, त्याप्रमाणे हा भैय्या बोरीबंदर स्टेशनवर उतरतो त्या तेवढयाच दिवशी बिचारा असतो. नंतर त्याला महाराष्ट्रात काम मिळालं की तो बिच्चारा राहत नाही. तो उत्तर प्रदेशचा होतो, बिहारचा होतो. आणि मग त्याची दादागिरी सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची राजकीय उद्दिष्टे पुरी होऊन देणार नाही.
पण नेमका काय प्रश्न आहे या सगळयांचा ?
राज : असं आहे... चॅनल चालवतात यु.पी.-बिहारमधले भैय्ये पत्रकारच ! त्यांना मी डोळयात सलतोय. पण मी सांगतो की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या उद्दिष्टापासून कणभर दूर हटणार नाही. त्यांनी माझ्या नावाने कितीही ओरड केली तरी हरकत नाही. या महाराष्ट्रातला बारा कोटी मराठी मी एक करून महाराष्ट्र युरोपपेक्षा भव्य-दिव्य करणारच एक दिवस.
पण मराठी माणूस एक कुठाय ? बरेच ’एलिट’ महाराष्ट्रीय तुम्हाला हिंदी भाषिकांच्या आवाजात आवाज मिसळून शिव्याशाप देताहेत. ते म्हणतात, हा स्टंट आहे राज ठाकरेंचा. विजया राजाध्यक्ष पण बोलल्यात तुमच्याविरुद्ध... आता सांगा ?
राज : (क्षणभर विचार करत) अक्खा देश जर (थांबून) केवळ अक्खा देशच नव्हे तर गल्फपासून ते बीबीसीपर्यंत सर्व जण जर या राज ठाकरेच्या स्टंटवर प्रतिक्रिया देत असतील, तर त्या मूळ क्रियेत काहीतरी असणारच ना ? आता विजया राजाध्यक्ष आणि एलिट महाराष्ट्रीयन... हे बघा, मी त्यांच्यासाठी करतच नाहीये. हया लोकांसाठी करतच नाहीए मी हे. ह्यांच्या पोराबाळांसाठी करतोय मी...ह्यांची पोरंबाळंच दुवा देतील मला...ह्यांच्याकडनं मला आशीर्वादाची अपेक्षा पण नाहीए. यांना हा विषयच कळत नाही. आयुष्यभर मराठीत लिहिलंत तुम्ही...पुढे ती पुस्तकं घ्यायला तरी पाहिजे ना कुणीतरी! उद्या ह्यांच्याच मराठी पुस्तकांची पानं फाडून हेच भैय्ये हसत हसत चणे विकतील... तेव्हा काय कराल ?
हे सारं तुमच्यात कशातनं आलं आहे अचानक ?
राज : अचानक नाही...सच्ची तळमळ. मला महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची सच्ची तळमळ आहे. मलाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या माझ्या प्रत्येक सहकार्याच्या मनात ही आग आहे. आम्ही असू कदाचित मूठभर. पण महाराष्ट्र आम्हीच बदलू ! बदलूच बदलू !! तुम्हाला एक दिवस आमच्यासोबत यावंच लागेल.
तुमचे पंधरा-पन्नास लोक उपद्व्याप करत फिरतात असं खुद्द शरद पवार म्हणालेत ?
राज : (राज फक्त्त हसतात) महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत ते.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment