राजशी सुरुवातीच्या दोन-तीन भेटींत माझं त्याच्याविषयीचं मत फारसं बदललं नाही. त्या दोन्ही-तिन्ही भेटी या व्यावसायिक स्वरूपाच्याच होत्या. त्याची (मी वर उल्लेखलेली) मुलाखत हीसुद्धा मी घेतलेल्या आणि फार न गाजलेल्या मुलाखतीतील एक होती. या माणसावर नजर ठेवून राहिलं पाहिजे, मग आपल्याला तो आवडो वा न आवडो या व्यवसायातील चतुरपणाने मी राजला लक्षात ठेवलेलं होतं. त्यात एकदा एका समारंभात माझी आणि राजची गाठ पडली. ज्या समारंभात राजने श्रोता असण्याची भूमिका घेतलेली होती. आम्ही काही जण बोलणार होतो. माझी जेव्हा वेळ आली, तेव्हा मी राजच्या तेव्हाच्या पक्षाची (शिवसेना) भूमिका आणि त्यातला भंपकपणा यावर खूप चिरफाड करून बोललो. मला वाटलं राज त्याच्या (माझ्या कल्पनेतल्या) स्वभावाप्रमाणे माझ्यावर भडकेल. त्याचे काहीही करण्याला तयार असणारे अनुयायी कदाचित हॉलमधून उतरल्यावर माझ्यावर तुटूनही पडतील अशी काहीशी चिन्हं मी माझ्या मनाशी रंगवली होती. हौतात्म्यास मी तयार होतो! कार्यक्रम संपल्यावर राज आला आणि म्हणाला, ‘‘कधी भेटूया?’’ त्यानंतर आम्ही बर्याचदा भेटलो. राजचा एकच मुद्दा असायचा. काय चुका झाल्या ते तुम्ही विश्लेषक सांगता. त्या सुधारणार कशा ते तुम्हाला सांगता येत नाही. त्यावर माझं उत्तर हेच की, ‘‘ते जर माहीत असतं, तर आम्हीच राजकीय नेते झालो असतो.’’ पण सुरुवातीच्या काळात हे उत्तर मी देत नसे. कारण खाली उभ्या असणार्या राजच्या अनुयायांची संख्या लक्षणीय होती. शिवाय प्रत्येक वेळी हौतात्म्याची मनाची तयारी नसायचीच! या संबंधातल्या राजच्या प्रतिमेचा समाजात किती खोल परिणाम झाला होता त्याचं एक उदाहरण देण्याचा मोह इथे मला आवरत नाही. एकदा ‘राष्ट्रवादी’ या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुखपत्राचा एक अंक त्याच्या संपादकांना राजला पोहोचवायचा होता. तो अंक पोहोचवणारे दूत विलास म्हणून मध्यमवयीन गृहस्थ तो अंक पोहोचवायला मी राजच्या घरचा पत्ता देऊनही टाळाटाळ करू लागले. कारण विचारलं तर तेही सांगेनात. शेवटी अगदीच खोदून विचारलं तेव्हा म्हणाले, ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आलो असं कळल्यावर राज ठाकरेंचे अनुयायी माझी चटणीच करून टाकतील!’’
राज : मित्र म्हणून...
राजने एखाद्याला मित्र मानलं की तो स्वत:चं सुख त्याच्याबरोबर वाटून घेतो आणि त्या मित्राची दु:खं आपलीशी करतो. खरं तर त्याच्याबाबतीत मला राहून राहून हेच आश्चर्य वाटतं की, सर्वच राजकीय पक्षांबाबत आणि त्यांच्या नेत्यांबाबत तटस्थता पाळणारा मित्र म्हणून त्याच्यात इतका गुंतत कसा गेलो? वास्तविक अनेक राजकीय नेते खूप चांगले मित्र असतात. परंतु तरीही लेखक आणि राजकीय विश्लेषकांबाबत हे नातं बरंचसं हितसंबंधांवर उभं असतं. मला त्यात प्रचंड अवघडलेपणा येतो. माणूस म्हणून इंटरेस्टिंग असूनही राजकीय नेत्यांशी मैत्री करायला मला त्यामुळे बर्याचदा संकोच वाटतो. पण राजच्या बाबतीत मला हा संकोच वाटत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राजने एकदा तुम्हाला मित्र मानलं की, तुमच्याकडून त्याची एवढीच अपेक्षा असते की, तुम्ही या नात्याचं पावित्र्य जपावं. बस्स, आणखी काही नाही. किणी प्रकरणी राज ठाकरेंना जवळजवळ फाशी द्यावे असा निकाल देणारे अनेक समाजवादी पत्रकार ‘बांधव’ राजकडे त्याचे जन्मजन्मांतरीचे आणि कल्पांतापर्यंतचे साथी असल्यासारखे कामं घेऊन आल्याचं मी डोळ्यांनी पाह्यलंय. यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजच्या मनाच्या तळाशीसुद्धा त्यांच्याबद्दल अजिबात निखार नाही. त्यांचं काम त्यांनी केलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं ही त्याची भूमिका. विखाराने विखार वाढतो. तो आपल्या बाजूने कमी केला नाही, तर एकंदरीत जगातला विखार कमी कसा होणार? ही त्याची भूमिका. या बाबतीत तो गांधीजींचा भक्तच आहे. गांधीजींची असंख्य चरित्रं त्याच्याकडे आहेत. त्यांची त्याने पारायणं केलीत. गांधीजींची एक अप्रतिम फोटोबायोग्राफी त्याने मला भेट दिली त्यावर, ‘हे पुस्तक वाचून माणसाने कोणत्या मूल्यांसाठी जगावं ते कळतं’, हे वाक्य लिहून!
राज दिसतो त्यापेक्षा प्रचंड खोल आहे. तो समोरच्याच्या तळाचा वेध घेतो. त्याला जर कुणी गंभीरपणे घेत नसेल, तर तो आपल्या आयुष्यातली मोठीच राजकीय चूक करत आहे. राजने जेव्हा शिवसेना सोडायची असं ठरवलं, तेव्हा तो एका मानसिक द्वंद्वातून जात होता. त्याची सर्वात मोठी समस्या हीच होती की, त्याच्यावर आणि महाराष्ट्रासंबंधीच्या त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार्या त्याच्या असंख्य अनुयायांच्या आयुष्याची जी गळचेपी चाललेली होती त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. ‘‘आपला महाराष्ट्र हा कुणाहीपेक्षा मोठा आहे.’’ असं तो एकदा म्हणाला. पुढे म्हणाला, ‘‘अगदी बाळासाहेबांपेक्षाही’’. तेव्हाच मी राजचा निर्णय झालेला आहे, याची खूणगाठ बांधली. रात्रीच्या वेळेला सभा असली की, आपला प्रत्येक कार्यकर्ता कशा पद्धतीने जाणार आहे याची खात्री करून घेतल्याशिवाय राज गाडीत बसत नाही. बाहेरगावी जर सभा असेल, तर तो सर्वांना रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून शक्यतोवर प्रवास न करण्याची तंबी देऊनच गाडीत बसतो! त्याचा सूर्यकांत पवार नावाचा कार्यकर्ता असाच व्यक्तिगत कामासाठी रात्री मुंबईहून सातार्याला निघाला असताना रस्त्यावर अपघातात गेला. त्याच्या आठवणीने राजच्या डोळ्यांत आजही पाणी येतं. शिवसेनेच्या प्रथम वर्तुळाने राजच्या सर्व कार्यकर्त्यांची केवळ ते राजचे प्रेमी आहेत म्हणून नाकेबंदी केली, तेव्हा राज कळवळतच राहिला. पण बराच काळपर्यंत त्याला बाळासाहेबांपर्यंत या समस्येचा तर्क नेता येत नसे. आजही बाळासाहेबांना कुणी दोष दिला, तर त्याचा कधीही तोल जातो. एकदा मी स्वत:, ‘‘हे सारं बाळासाहेबांना नीट आकलन होत नाही की काय?’’ असं काहीसं उपरोधाने म्हणालो. तेव्हा राजची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. तो म्हणाला, ‘‘तुझं बोलणं सोपं आहे. कारण तुझ्यासाठी हा विषय हे बोलल्यावर संपतो. पण जर तू बाळासाहेबांच्या जागी असतास, तर तूच काय तर या जगातला कुणीही माणूस वेगळं काहीच करू शकत नव्हता. चूक बाळासाहेबांची नाही. त्यांचं वय आणि त्यांच्या भोवतीची परिस्थितीच अशी आहे की ते विवश आहेत. आपण, निदान मी तरी त्यांना दोष देता कामा नये.’’ शिवसेना सोडण्याअगोदरच्या अनेक रात्री राजने बाळासाहेबांसाठी जागून काढलेल्या आहेत. अशाच एका वेदनामयी रात्री त्याने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट मला सांगितली. लहान असताना एकदा गरम गरम मटणाचा रस्सा कुणाच्या तरी हातून सांडला. त्यातलं गरम मटण राजच्या अंगावर सांडलं. राज पुरा भाजला होता. नंतर त्याच्या जखमांना तेल लावण्यापासून ते पट्टया रोज बदलत राहण्यापर्यंत सर्व काही बाळासाहेब करत असत. राज पूर्ण बरा होईस्तोवर बाळासाहेबांकडेच झोपत असे. अशा एक नव्हे अनेक आठवणींचे कढ राजला आवरत नसत.
शिवसेना राजने सोडली तेव्हा...
त्याच काळात मी एकदा पुण्याला होतो. कुठच्या तरी समारंभातून बाहेर पडत होतो. राजचा फोन आला. कोणताही संदर्भ न देता राज म्हणाला, ‘‘मला या लोकांनी हे असं करायला लावू नये. मी शक्य तितके प्रयत्न केलेत. माझ्यावर प्रेम करणार्यांचा काय दोष? आता त्यांना पराकोटीचा त्रास देताहेत. ठरवलं तर सगळे साफ होतील. पण मला हे करायला न लागलं तर बरं.’’ पण पुढे त्याला ते करायला लागलंच. या संदर्भातली एक आठवण लिहिण्याचा मोह मला आवरत नाही. राजने शिवाजी पार्कवर जी पहिली महासभा घेतली, ती घेण्याआधी खूप दिवस अगोदर एका मध्यरात्री मी आणि तो त्याच्या घराच्या गॅलरीत उभे होतो. राजने मला विचारले, ‘‘सभेच्या वेळी मैदान किती भरेल?’’ मी उत्तर न देता उलट त्यालाच उत्तर विचारलं. तो म्हणाला, ‘‘पूर्णपेक्षाही खूप जास्त.’’ प्रत्यक्ष सभेच्या दुपारी मी त्याच्या घराच्या गॅलरीत पोहोचलो. तोपर्यंत गर्दी जमायला सुरुवात झाली नव्हती. राज येऊन मागे उभा राहिला. हसला आणि म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. पूर्ण भरेल.’’ पुढचं वेगळं लिहायला नकोच.
अलीकडेच त्याच्या एका पदाधिकार्याने त्याला येत्या निवडणुकीसंबंधात काही काळजीच्या सुरात चार गोष्टी सांगितल्या. तेव्हा राज त्याला म्हणाला, ‘‘काळजी करून नकोस. मी आहे ना!’’ या त्याच्या आत्मविश्वासामागे नेमकं रहस्य काय? असं मी त्याला एकदा विचारलं तर म्हणाला, ‘‘मी समोरच्याला आधी पूर्ण खेळू देतो.’’ हे एक मात्र तो इतर कोणाकडूनही शिकलेला नाही. हे त्याचं स्वत:चंच अस्त्र आहे. त्याचे काही अनुयायी त्याला सोडून शिवसेनेत जातात, तेव्हा तो इतक्या शांतपणे घेतो की मला कधी कधी त्याचीच इच्छा असावी असा दाट संशय येतो. या प्रत्येक प्रसंगात ‘मी ठरवलं तर सगळे साफ होतील’. हा त्याचा निर्वाणीचा आवाज मला पुन्हा पुन्हा ऐकू येतो. भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण हा स्वत:वरचा विश्वास आणि निर्वाणीच्या परिस्थितीतही शांत राहण्याचा वकूब राजकडे अव्वल दर्जाचा आहे. तो भावनिक नात्यामध्ये लगेच मेणासारखा मऊ होतो. मित्रांसाठी, सहकार्यांसाठी त्याच्या डोळ्यांत चटकन पाणी येतं. शिवाय इतर अनेकांसारखा तो त्या पाण्यावर भागवत नाही. तर सर्व शक्यतांमधून तो त्यांना मदत पोहोचवतो. पण हाच राज संकटाच्या वेळी, कसोटीच्या क्षणांच्या वेळी अविचल आणि दगडासारखा कडक असतो. याला अपवाद एकच. अगदी भावनिक गुंत्यातल्या माणसाने त्याच्यावर वार केला किंवा त्याच्यावर संकट आणलं, तर त्याला नेमकं काय करावं हे कळत नाही. तो विचलीत होतो. दुर्दैवाने हे प्रसंग त्याच्या आयुष्यात अनेकांकडून त्याच्यावर पुन्हा पुन्हा आलेत.
राज सौंदर्याचा आणि संगीत ते चित्रकलेपर्यंतच्या सर्व कलांचा कमालीचा भोक्ता आहे. आम्हाला जोडणारा हा अजून एक धागा. त्याला संगीतातलं, चित्रपटातलं आणि चित्रकलेतलं खूप कळतं. इतकं की, यातल्या कुठल्याही क्षेत्रात तो व्यावसायिक म्हणून सहज स्थिरावू शकला असता. (उद्धवची राजकडून तीच अपेक्षा होती!) गोष्ट कशा रीतीने रचली की, ती सुंदर दिसेल याची राजला अचूक कल्पना असते. मग ते सभास्थान असो की, जेवणाची थाळी. राज ते अधिकाधिक सुंदर करण्याच्या प्रयत्नात असतो. इतर अनेक जण स्वत:च्या शरीरापासून ते अनेक बाबतीत सौंदर्यविरोधी असल्यासारखे वागतात. राज त्याबाबतीतही राजा आहे. एखादी व्यवस्था त्याने ताब्यात घेतली की तो सुंदर करणारच याची खात्री बाळगावी.फोटोबायोग्राफीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ‘गेट वे ऑफ इंडिया’ वर होणार होता, तेव्हा राजने त्याच्या बारीकसारीक तपशिलांची इतक्या बारकाईने तयारी केली होती की, पाहणार्यांनी तोंडात बोटं घातली. त्याच्यासोबत सिनेमा पाहताना त्याच्या प्रत्येक तपशिलांची इतक्या बारकाईने चर्चा त्याच्यासोबत करता येते की, त्यात अपार बौद्धिक आनंद मिळतो. तेच संगीताबाबत, पाश्चिमात्य, शास्त्रीय संगीतापासून ते ऑपेराजपर्यंत आणि हिंदी चित्रपटगीतांपासून ते लोकगीतांपर्यंत सर्व प्रकारच्या संगीताचा मोठा संग्रह त्याच्याकडे आहे. मुख्य म्हणजे, उत्तम प्रतीच्या संगीताबद्दल त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. तो संगीतच्या अरेंजिंगपासून ते संगीत रचनेपर्यंत सारं अगदी खुबीने करू शकतो. हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. जे संगीत, चित्रपटांबाबत खरं, तेच खाद्यजीवनाबाबतीतही. जगभरचे विविध खाद्यप्रकार कसे उत्क्रांति झाले यापासून ते, ते खाण्याची पक्रिया कशी आहे याचं राजला टेरिफीक ज्ञान आहे. खाण्याच्या प्रक्रियेची संस्कृती मोडून पदार्थ खाल्लेला राजला जाम आवडत नाही. चित्रकार तर तो आहेच. काकांकडून त्याला मिळालेला हा अजून एक वारसा. संगीताचा वारसा राजला आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे. श्रीकांतजींबद्दल राज अनेक आठवणी सांगतो. त्यातली एक आठवण राजकीय आहे. श्रीकांतजींनी आयुष्यभर बाळासाहेबांना साध्या पदांच्या नेमणुकांबाबतही साधी सूचना केली नाही. शिवसेनेतला कुणीही ‘राज जे काही आहे ते ठाकरे असल्यामुळेच आहे’ असं जेव्हा म्हणू लागला, तेव्हा राजला मोठं आश्चर्य वाटलं. उपरोधाने तो म्हणाला, ‘‘च्यायला, शिवसेना एवढ्या लवकर श्रीकांत ठाकरेंचं योगदान विसरेल असं वाटलं नव्हतं!’’
|
0
comments
]
0 comments
Post a Comment