न विसरण्याजोगा गुण ....

राजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा त्याच्यासोबत त्याला मानणारे जे आले त्यातले काही परत शिवसेनेत गेले. त्यातल्या काहींनी परत जाण्याची जी कारणं दिली त्यातली कारणं ही, ‘स्टेजवर बसायला मिळालं नाही’ ते ‘मनाजोगतं पद मिळालं नाही’ इथपर्यंत विस्तारलेली होती! खरं तर यांच्यासाठी आणि यांच्यामुळे राजने स्वत:च्या आयुष्यातला सर्वात वादळी निर्णय घेतलेला होता. मी स्वत: याचा साक्षी होतो. त्यातलेच काही जण परत शिवसेनेत गेले. या संबंधातली एक आठवण खूपच मार्मिक आहे. एका समारंभात राजला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलेलं होतं. त्या संयोजकांनी राजचं नाव ‘आणि राज ठाकरे’ असं काही राज्यमंत्री वगैरेनंतर खाली टाकलेलं होतं. खरं तर शेवटी नाव देऊन महत्त्व देण्याचा वेगळा प्रयत्न त्यांच्याकडून होता. पण राजच्या ऑफीस मध्ये यासंबंधीचा फॅक्स आल्यावर त्याच्या अनुयायांत चलबिचल झाली. ते बिथरले. आमच्या पक्ष प्रमुखाचं नाव शेवटी टाकता म्हणजे काय? अशा गोष्टी झाल्या. राजच्या सचिवाने ही गोष्ट माझ्या कानावर घातली. माझ्या कानावर घालण्याचं कारण म्हणजे संयोजक माझ्या ओळखीचे होते. मी म्हटलं, ‘‘मी त्यांना बोलून बघतो.’’ राज समोरच बसलेला होता. नेमकं प्रकरण काय होतं हे त्याला ठाऊक नव्हतं. त्याने चौकशी केली. सचिवाने प्रकरण समजावून सांगितलं. राजने तात्काळ त्याला उडवून लावलं. ‘‘अरे, आपण हा प्रकार सुरू केला, तर तो आपला अमकातमका शिवसेनेत परत गेला त्याच्यात आणि आपल्यात फरक तो काय?’’ स्वत:च्या उद्दिष्टांबाबत आणि मूल्यांबाबत राज फार जागरुक असतो. त्याचं हे उत्तम उदाहरण.

राजकडे शिवसेना आली असती तर...

कधी कधी मी उद्धवच्या बाजूने (म्हणजे त्याच्या बुटात पाय घालून) विचार करतो, तेव्हा मला वाटतं की त्याच्या बाजूने तो एवढ्या स्वयंप्रकाशित भावाचं काय करू शकत होता? त्याच्याकडे पर्यायच कमी होते. त्यात त्याचे सल्लागार अगदीच कमी वकुबाचे होते. उद्धव स्वत: राजकारणात फारच उशिरा आला. म्हणजे माणसाचं घडायचं म्हणून जे वय असतं, ते सरून गेल्यावर. या उलट राज घडायचं वय जायच्या अगोदरच राजकारणात आला. या सार्‍याचा परिणाम म्हणून आपण जे पाहतो ती परिस्थिती आहे. हे सारं सोनिया गांधींच्या बाबतीत कसं चालून गेलं? असा युक्तिवाद यावर केला जातो. पण स्त्रीच्या बाबतीत हे सारे संदर्भ पूर्णत: बदलतात. शिवाय काँग्रेसची रचनाही इतर कुठल्याही साचेबद्ध पक्षाहून पूर्णत: भिन्न आहे. उद्धव वा राजच्या संदर्भात चटकन हे उदाहरण देणं (उद्धवच्या बाजूने) हे पूर्णत: चुकीचं विश्लेषण आहे.


राजचं राजकारणाचं आणि परिस्थितीचं आकलन हे एखाद्या बेरक्या माणसासारखं खोल खोल आहे. त्यामुळे कितीही अडचणीची परिस्थिती असली, तरी राज स्वबळावर तरून वर येऊ शकतो. उद्धवला भोवतालच्या माणसांवर अवलंबून राहायलाच लागणार आहे. एक उदाहरण लिहितो. राजने शिवसेनेशी फारकत घेतल्यावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. अनेकांना असं वाटलं होतं की, राज ‘राजसेना’ वगैरेसारखं नाव घेऊन शिवसेनेसारखं काहीतरी सुरू करेल. पण राज शांत राहिला. अज्ञातवासात गेला. त्याने खूप चिंतन केलं. एका परीने तपश्र्चर्याच केली आणि मग त्याने नवा पक्ष, नवा ध्वज, नवं धोरण व नवीच संस्कृती जाहीर करायला सुरुवात केली. ज्याचा शिवसेनेशी काय तर भारतातल्या एकंदरीतच राजकीय संस्कृतीशी कमी संबंध होता. एक नवीनच राजकीय संस्कृती प्रसवण्याचा प्रयोग बघून राजचे अनुयायी हडबडले. त्यातल्या बर्‍याच जणांना शिवसेनेपलीकडे काही सुचतही नव्हतं. राजने या सार्‍याची पर्वा केली नाही. आपल्याला जे करायचं आहे, तेच तो करत सुटलेला आहे. चाळीशीमध्ये राजकारणात असं प्रयोगशील काही प्रचंड आत्मविश्वास असल्याशिवाय कुणी करूच शकत नाही. याउलट उद्धव आपण ‘हिंदू की मराठी माणूस की खड्डे पडलेले रस्ते’ यातल्या कशावर बोलावं यावरच चाचपडतोय. राजचे कार्यकर्ते त्याला कधी कधी सांगतात. या अमक्यातमक्या विषयावर आपण ही भूमिका घेतली तर आपण हरू. राज म्हणतो, ‘‘मग हरू की. आपण जिंकायचंय ते आपल्याला राजकारणाचा व्यापार करायचाय म्हणून नव्हे तर लोकांच्या कल्याणाची भूमिका मांडण्याकरिता. ती मांडताना ती लोकांना न कळल्यामुळे आपण हरलो, तर ती परत मांडू. जिंकेपर्यंत मांडू. मग आपणच जिंकू!’’ हे एका वेगळ्याच राजकीय संस्कृतीचं जनन आहे. ते करणारा ‘राज श्रीकांत ठाकरे’ नावाचा एकोणचाळीस वर्षांचा तरुण आहे.

माझ्या मनाशी अनेकदा एक खेळ चाललेला असतो. जर राजकडे शिवसेनेची सूत्रं गेली असती तर काय झालं असतं? म्हणजे तो जर शिवसेनेचा कार्याध्यक्ष झाला असता, तर काय झालं असतं?

उत्तर : काहीच झालं नसतं. राजच्या नैसर्गिक सर्जनशीलतेला आणि ज्ञानगामी प्रयोगशीलतेला शिवसेनेत वावच नव्हता. म्हणजे याचा उद्धव किंवा राजकारणाशी काहीच संबंध नाही. याचं खरं कारण शिवसेनेची मूस पूर्णपणे घडलेली आहे. शिवसेना एकट्या बाळासाहेबांची आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ती कुणीही घडवू वा बिघडवू शकत नाही. उद्धव नाही, राज नाही किंवा अजून कुणीही नाही. बाळासाहेब आहेत तरच शिवसेना आहे. त्यांच्या पद्धतीची राजकीय संस्कृती तेच निर्माण करू शकतात, चालवू शकतात. राजचंही नेमकं तसंच आहे. त्यामुळे तो शिवसेनेतून बाहेर पडला ही मला इष्टापत्तीच वाटली. त्याचीही उत्क्रांती सुरू झाली अन्‌ त्याच्या प्रयोगशीलतेचीही!

राज : संघर्षाच्या काळात ...

पक्ष स्थापनेनंतर आता जवळजवळ 2 वर्षे उलटली आहेत. राजने ‘मराठी’ च्या मुद्यावरून हाती घेतलेली आंदालने, त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. विक्रोळीतल्या एका भाषणामुळे राजने अंगावर वादळ ओढावून घेतलं. गंमत म्हणजे त्या अगोदर त्याचा पक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हा N.G.O. आहे काय, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. विक्रोळीतल्या सभेनंतर हाच पक्ष देशभर चर्चेचा विषय झाला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या अविरत संघर्षाचा रस्त्यावरच्या लढायांचा, कोर्टातल्या खटल्यांचा, सत्ताधीशांच्या रोषाचा एक प्रचंड मोठा सिलसिला सुरू झाला. जो आजतागायत सुरू आहे. स्वाभाविकपणे तो पुढेही चालू राहणार हे स्पष्ट आहे. मराठीचा आणि महाराष्ट्र धर्माचा मुद्दा घेऊन राज संघर्षात उतरला. त्यातलं राजकारण हा माझ्या या लेखाचा विषयच नाही. पण लाठीमार्‍या, तडीपार्‍या, कार्यकर्त्यांचे पोलिसांकडून होणारे हाल, स्वत:चं पोलीस संरक्षण (जे 17 वर्षं त्याला होतं) सरकारकडून काढून घेणं या सार्‍याला राज सामोरा जाताना अविचल होता. याच काळात मी त्याच्या एक-दोन मुलाखतीही घेतल्या. त्या घेताना मी त्याचा मित्र नव्हतो. आमच्यात गाय-गवताचं नातं होतं! व्यावसायिक म्हणूनही माझ्या लक्षात हे आलं की, तो जे बोलतो ते त्याचं स्वत:चं आहे. त्याची प्रेरणा (Conviction) त्याच्यामागे उभी आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला झालेली शिक्षा किंवा तडीपारी त्याच्या हृदयात बाणासारखी रुतलेली असते. त्यांना सोडवेपर्यंत तो सतत अस्वस्थ असतो. मला असे अनेक नेते माहीत आहेत, ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी असाधारण त्याग केलेला आहे आणि कार्यकर्त्यावर वेळ आली, तेव्हा त्याला त्या नेत्याची भेट तर सोडाच पण फोनवर बोलणंही करायला मिळालेलं नाही. याला राज हा केवढा अपवाद आहे.

नुकतीच त्याला काही महिन्यांच्या अंतराने दोनदा अटक झाली. त्याच्या नावाने दिवशी एखादं वॉरंट देशभरातून कुठून तरी एखादा भैय्या मिळवतोय. पण स्वत:च्या अटकेअगोदर राजला मी शांतपणे चित्र काढताना किंवा आवडलेला अनिमेशनपट मित्रांना समजावून सांगताना बघितलेलं आहे. तेव्हा सामान्य कार्यकर्त्याच्या अटकेनं हवालदिल होणारा हाच का तो राज ठाकरे, असा प्रश्र्न मला पडतो. मीडिया-विशेषत: हिंदी-इंग्रजी मीडिया - राजचं वर्णन जवळजवळ गुंड, हिंसाचारी, दादागिरी करणारा वगैरे वगैरे करत आपले टी.आर.पी. चोवीस तास वाढवत असताना स्वत: राज मात्र शांतपणे हे चॅनल बघत त्यातल्या निवेदकांचं कौतुक किंवा त्यांच्या चुका काढत असतो. स्वत:वर होणारे आरोप खोटे आहेत याविषयी तो खाजगीत अवाक्षर बोलत नाही. किंबहुना त्याची राजकीय भूमिका एकाकी पडलेली असताना, सर्व जगाविरुद्धच विषम असा संघर्ष करताना आपली बाजू मांडण्याकरता माणूस कसा तळतळेल? राजमध्ये या प्रकारच्या तळतळण्याचा मागमूसही नाही. त्याला उत्तर देण्याची घाईही नसते. स्वत:ची तत्त्वं स्वत: जगत असल्याशिवाय असला शाश्वत शांतपणा किंवा असली शाश्वत स्थितप्रज्ञता खूप कठीण आहे. याचा अर्थ राजला संघर्षाच्या काळात चिंता नसतेच असं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षातल्या इतर नेत्यांना आपली भूमिका नीट खोलवर कळली आहे वा नाही या चिंतेने तो नखं खात असतो. कार्यकर्ते सत्तेच्या मागे लागतील आणि मूळ तत्त्वाचा नाश होईल म्हणून तो धास्तावलेला असतो. त्याचे मित्र आणि त्याचे कुटुंबीय त्याची काळजी करत असताना त्याला स्वत:विषयी फारसं काही वाटत नाही. अगदी स्वत:च्या सुरक्षेविषयीही. देशभर त्याच्याविरुद्ध मोहोळ उठले असतानाही त्याची भूमिका तो कार्यकर्त्यांना समजावताना मी पाह्यलंय, ‘‘आपण लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. प्रेरणेने केलेल्या प्रत्येक कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलंच पाहिजे असं नाही!’’ राज हा संघर्षात अधिक कळतो. कारण ज्या काळात माणूस किंवा नेता घाबरून ओल्या कोंबडीसारखा फड्फडेल अशा काळात राज आतून शांत असतो. त्याला हीच एक गोष्ट नेतेपद प्रदान करते. त्याचा करिश्मा त्याने केलेल्या संघर्षामध्ये नाही. तर त्या संघर्षाच्या वेळी राखलेल्या त्याच्या संयमामध्ये आहे. दुर्दैवाने त्याच्या विरोधकांना आणि शत्रूंना हीच त्याच्याबद्दलची गोष्ट नीट कळलेली नाही. त्यामुळे ते त्याच्या चालींमुळे एकतर गोंधळतात किंवा चकीत होतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राज माझा इतका सखा मित्र असूनही संघर्षाच्या या काळात मला त्याची बरीच नवीन ओळख झाली असं मलाच वाटतं. तर इतरांची काय कथा?

त्याचं भविष्य माझ्या नजरेतून ....

राज माझा मित्र आहे याचं कारण राजकारण नसून आत्मिक आहे. कित्येकदा आम्ही न बोलता समोरासमोर बसून असतो. प्रत्यक्ष बोलत नसलो तरी बरंच बोलतो. कित्येकदा आम्हाला बोलावंच वाटत नाही इतकं एकमेकांचं मत कळतं. असे आपल्याला आयुष्यात दोन-तीनच मित्र असतात. ते आपलं आयुष्य समृद्ध करतात. आपल्याला समृद्ध करतात. राजच्या राजकारणाशी माझा संबंध आहे की नाही? असा प्रश्न बरेचजण मला करतात. तर तो आहेही अन्‌ नाहीही. राज माणूस म्हणून माझा मित्र आहे. आम्ही एकंदरीत जे बोलतो, शेअर करतो त्यात राजकारण फार तर सात-आठ टक्के असतं. त्यामुळे मित्र म्हणून जर राजने सिनेमा काढला असता, शेती केली असती, दुधाचा व्यवसाय केला असता तरी मी त्यात गुंतून माझी मतं मुक्तपणे मांडलीच असती. घ्यायचं न घ्यायचं त्याच्याकडे. तो राजकारण करतो. त्यामुळे त्याबाबतही माझा दृष्टिकोन आणि सहभाग हाच असतो. असतो आणि नसतोही...

राजकीय विश्लेषक आणि लेखक म्हणून माझी राजच्या पक्षाबाबतची हीच भूमिका आहे. त्याचा पक्ष नवीन आहे. काही क्रांतिकारक चांगलं करावं असं त्याला वाटतं. ते करण्यासाठी त्याला राज्यात अनेक पातळींवर सत्ता हस्तगत करावी लागेल. ती सत्ता मिळाल्यावर माझंही एक काम होईल. आज राजच्या पक्षाला अजून संधी नाही म्हणून टीका करता येत नाही. जर त्याला सत्ता मिळाली, तर मला त्याच्या प्रत्येक चुकीवर टीका करता येईल.

राजवर टीका करण्याची संधी मिळण्याची मी वाट पाहतोय. मी त्याला इतका ओळखतो की, त्याने महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलेली स्वप्नं खरी करताना छोटी चूक केली, तर माझ्याइतकी टीका त्याच्यावर इतर कुणीही करू शकणार नाही. शर्मिलावहिनी, राजच्या आईंना तेव्हा खूप वाईट वाटेल. पण राजच म्हणालाय,

‘‘आपल्या महाराष्ट्रापेक्षा कुणीही व्यक्ती मोठी नाही!!’’

0 comments

Post a Comment