गोविंदराव खरेदीला गेले की कुठलीही वस्तू असो, ती पाहून झाली की ते विक्रेत्याकडे आग्रह धरीत- मला पॅक पीस हवाय! एके दिवशी गोविंदराव दुपारी एकटेच घरी असताना दारावरची बेल वाजली. गोविंदरावांनी दरवाजा उघडला. दारात हसतमुख चेहऱ्याने एक रुबाबदार तरुण उभा. गोविंदरावांनी काही विचारायच्या आतच त्याने पोपटपंची सुरू केली- “सर, आमच्या डायमंड वॉचेसतर्फे फक्त आजच्या दिवस तुमच्यासारख्या काही खास लोकांसाठी एक स्पेशल स्कीम- एका लेडीज वॉचवर पुरुषांसाठी एक घड्याळ फ्री… आणि तेही सवलतीच्या दरात!” आणि त्याने लगेच दोन चकचकणारी घड्याळे गोविंदरावांच्या हातावर ठेवली.
नेहमीप्रमाणे गोविंदरावांनी घड्याळे नीट निरखून पाहिली आणि विचारले, “केवढ्याला?”
“तशी एमआरपी दोन हजार रुपये आहे, पण आज आम्ही ती दोन्ही देत आहोत फक्त हजार रुपयांत!”
“ठीक आहे, पण मला पॅक पीस हवाय!”
“यस सर, पॅक पीसच देतो आणि खास तुमच्यासाठी कंपनीने केलेला गिफ्ट पॅकच देतो. वहिनी आल्या की थेट त्यांच्या हातीच द्या गिफ्ट पॅक फोडायला, बघा त्या किती खूष होतील तुमच्यावर!”
केवळ कल्पनेनेच गोविंदराव आनंदले आणि घाईघाईने त्यांनी पाचशेच्या दोन नोटा देऊन तो गिफ्ट पॅक ताब्यात घेतला. संध्याकाळी मोठ्या थाटात त्यांनी तो गिफ्ट पॅक पत्नीला दिला. मालतीबाईंनीही अलगद कागद उलगडून गिफ्ट पॅक उघडला. आत दोन घड्याळे होती. हुबेहुब विक्रेत्याने दाखवली तशीच… पण खेळण्यातली!
|
0
comments
]
0 comments
Post a Comment