राष्ट्रवादी काँग्रेसवरील नाराजी तसेच मराठ्यांचे आरक्षण अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठीतील नेमका तपशील कळू शकला नसला तरी, भविष्यात शिवसेनेची राज्यात सत्ता आणण्यासाठी भुजबळांना गळाला लावण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून झाल्याचे कळते.रात्री नऊच्या सुमारास भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गाड्या नियोजित भेटीनुसार 'मातोश्री'वर धडकल्या. शिवसेना सोडल्यानंतर सुमारे १६ वर्षांनंतर भुजबळांचे 'मातोश्री'ला पाय लागले. त्यांच्यासोबत पुत्र पंकज, पुतण्या समीर आणि इतर कुटुंबातील सदस्य होते. भुजबळ कुटुंबियांचे स्वागत उद्धव, रश्मी ठाकरे यांनी केल्यानंतर भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. याआधी बऱ्याचदा फोनवरून बोलणे झाले असले तरी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच भुजबळ मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले. यावेळी भुजबळांनी पुष्पगुच्छ देवून बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजळा मिळाला. राष्ट्रवादीतील भुजबळ यांच्या सध्याच्या स्थानाविषयीही चर्चा झाली. तेलगी प्रकरणानंतर भुजबळांना राष्ट्रवादीने वळचणीत टाकले होते. मात्र मधल्या काळात 'मातोश्री'शी सख्य वाढल्याने त्यांना पुन्हा पक्षात वरचे स्थान मिळाल्याविषयी यावेळी चर्चा झाली. मराठ्यांचे आरक्षण ओबीसींच्या कसे मुळावर येणार आहे, याचा पाढा भुजबळ यांनी यावेळी वाचला. राणे यांचे नेमके काय होऊ शकते याविषयी देखील भुजबळ यांचे आडाखे बाळासाहेेबांनी यावेळी जाणून घेतले. लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारशी ताकदीची गरज नसली तरी विधानसभा निवडणूकांच्या आधी भुजबळ सेनेत आले तर काय होईल याविषयी देखील चर्चा झाल्याचे कळते. अर्थात भुजबळ यांनी यावेळी स्वत:कडून कोणताही शब्द दिला नसल्याचे कळते.शिवसेना नेते अंधारात!शुक्रवारी रात्री खासदार मनोहर जोशी यांच्या 'ओशियाना'तील घरी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जोशी अशी एक बैठक झाली. मात्र भुजबळ भेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शनिवारी सकाळी 'मातोश्री'वर संजय राऊत, सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे अशी एक बैठक झाली. मात्र यावेळी देखील या नेत्यांना रात्री भुजबळ घरी येणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.

0 comments

Post a Comment