भारतीय टपालखात्याच्या अजबगजब कारभारामुळे कुणा वाचकाने लोकसत्तेस पाठविलेले पत्र चुकून आमच्या पत्त्यावर आले. आता लोकसत्तेस रोज एवढी पोतेभर पत्रे येतात. (आणि यात अतिशयोक्ती नाही! अन्य पत्रांनी वाईट वाटून घेऊ नये.) त्यात या पत्राची दखल घेतली जाईलच असे नाही, असे वाटल्याने आम्हीच ते येथे प्रसिद्ध करीत आहोत. कारण की पत्र मोठेच उद््बोधक आहे!! अलीकडेच रा. रा. बापू आत्रंगे यांनी लोकसत्तेच्या मुखपृष्ठाच्या किरकोळीकरणाबद्दल लिहिले होते. त्या वाक्याच्या स्मृतींना हे वाचकपत्र धादांत अर्पण…

——————————————
प्रिय संपादक, लोकसत्ता, मुंबई
विषय - लोकमानस या सदराकरीता लेख.
महोदय,मी आपल्या पेपरचा खूप वर्षांपासूनचा वाचक आहे. आमच्या नगरसेविकेने आमच्या वॉर्डात एक पेपरचे वाचनालय सुरू केले आहे. ते आता बंद पडले. पण तेथील सगळे पेपर आता शाखेत पडतात. मी तेथे जाऊन तुमचा पेपर रोज वाचतो. मला तुमचे सगळे लेख खूप आवडतात. मी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंतचे सगळे अग्रलेख आवडीने वाचतो. बातम्यासुद्धा वाचतो.
तुमचा पेपर वाचून आम्हांस खूप नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती खूप उपयोगी असते. काही दिवसांपूर्वी तुम्ही सारेगमची हेडलाईन छापली होती. ती आम्हांला खूप आवडली कारण की आम्हांला ती मालिका खूप आवडते. आमच्या घरातील सगळेच जण ती मालिका पाहतात. गायिका लता मंगेशकर यांनी मुलांना आर्शिवाद दिला ते आम्हांला खूप आवडले. कारण की लता मंगेशकर यांच्या कॅसेटी आम्ही आवडीने ऐकतो व त्यांची गाणीसुद्धा ऐकतो. आम्हांला लता मंगेशकरांचे बाबा आणि बाळ हे सुद्धा आवडतात. त्या लहान लहान गायकांना भेटल्या ही बातमी खूप महत्वाची आहे, असे आमच्या खात्यात सगळेच म्हणाले. मी गोदरेज कंपनीत शिक्युरिटीत आहे. माझ्या कुटुंबाने सारेगमला आरया आंबेकरला चार एसेमेस पाठविले आहेत. तसेच आजची बिग बॉसची बातमीपण आम्हांला खूप आवडली. आम्ही ती मालिकापण पाहतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला चार दिवस सासूचे ही मालिका खूप आवडते. तिची हेडलाईन तुम्ही कधी छापणार याची वाट आम्ही पाहतो आहोत.
बिग बॉसच्या घरातील भाडेकरू पळून गेले हा सिक्युरिटीला मोठा धक्का आहे. सिक्युरिटी टाईट पायजे होती. आमच्या कंपनीत सिक्युरिटी एकदम कडक आहे. (कृपया हे वाक्य काटू नका. महत्वाचे आहे.)संपूर्ण देशातील सिक्युरिटीचे कसे बारा वाजले आहेत, हे तुमच्या बातमीमुळे सगळ्यांना कळले. देशाला दहशतवादाचा धोका आहे, हे पण बिग बॉसच्या बातमीमुळे कळले. याच्यावर तुम्ही एक सणसणीत अग्रलेख लिहा. काहीकाही मालिका लई लांबवित्यात. त्याच्यावरपण बातमी करायला जमली तर पाहा, कारण की त्याच्यामुळे मालिकांतला इंटरेस संपून जातो. हे समाजासाठी चांगले नाही.
चार दिवस सासूचेमधील मुख्यमंत्री कसे पण वागतात. एकदा त्यांचीपण बातमी छापा. तसेच असंभव सुलेखाला अटक झाल्यावर तिची नार्को चाचणी करण्याची गरज आहे, अशीपण बातमी छापा. ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक खुन उघडकीस येतील.
मला तुमचे अग्रलेख खूप आवडतात. म्हणून कृपया माझे हे पत्र पहिल्या पानावर ठळक बातमी म्हणून छापणे, ही विनंती.चुकलं माकलं माफ करा. थोडं लिहिलं जास्त समजा.
कळावे,तुमचा नम्र वाचक.
(Thanks to चांगदेव पाटील,(Baatmidar Blog), दि. १८ नोव्हेंबर २००८)

0 comments

Post a Comment