टांण टांण टांण टांअण टांण..........
हे ऐऐऐऐ.......................... हुर्रे!
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
काही दिवस आता आई
लागू नकोस हा पाठी
नको दप्तर नकोच पाटी
नको देऊस खाऊची वाटी
सुटी सुटी सुटी मी मे महिन्याची सुट्टी
अस्स स.......................... चक
कच्च्या पक्क्या मण्यांनी लगडली
आहे करवंदाची जाळी
आंबट झेर फोड कैरीची
अन चिंचेची अवीट गोडी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
नको रिबीन नकोच वेणी
फिरूदे मला तशीच झिपरी
सैल गाठ अंबाड्याची
दे घालून माने वरती
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
बोंडा बोंडातून उडणारी
चल पकडू उनाड शेवरी
रानामधल्या सोनं तुऱ्यांची
चल जमवूया जुडी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
तास अन तास नदी काठी
मारू डोहामध्ये दडी
सूळ-सूळ सूळ-सूळ पोहणारी
मी पाण्यामधली मासोळी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
आऽऽछी.....!
तशाच भिजल्या अंगांनी
तशाच भिजल्या अंगांनी
तांबूस पिवळी.. हिरवट निळी
ही बघा अनोखी मज गाठी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
या डोंगरा पलीकडची
दिसली का गं निळी टेकडी
त्या टेकडी पल्याड राहते
चल बघू मोरांची जोडी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
चिंगी नाही पिंकी नाही
भुण-भुण करते म्हणते ताई
चल मामाच्या गावाला जाऊ आई
झुका-झूक झूक-झूक अगिनगाडी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
मामीच्या खोलीत जाऊनी
उगाच उचक पचक करावी
साळसूद आव आणून वरती
साळसूद आव आणून वरती
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
.आता बस्स ना गं आई
बाबा एकटा आहे घरी
बाट बघत असेल चिंगी
कान गोष्टींची झालीये घाई
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
मुरंबे मोरावळ्याची बरणी
आजी देणार यंदाही नक्की
कोणतीही कर मग भाजी
बरणीभर मज पुरे बेगमी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
आवळ्याची कडक सुपारी
साबूदाण्याची मस्त पापडी
साखरेमध्ये मुरत घातली
रातांब्याची लाल वाटी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
घेऊन बसेन हां मी काठी
राखाया अंगणात दुपारी
कावळे चिमण्या बघेन हां मी
मला खाऊदे ओली चकली
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
असा लगडलाय पेरू दारी
आई आता कर ना गं जेली
आणून देते रंगासाठी
फळे तूतूची हवी तेवढी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
अंगण उकरू खडे फेकू
धोपटून धोपटून माती बसवू
शेणसडा अन रांगोळी
अंगणाची ऐटच न्यारी
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
कुहु-कुहु कोकिळ गाती
टीर-टीर टीर-टीर पोपट जोडी
आणि दारी चिवचिवणारी
आम्ही पाखरे सारी
भुर्रर्रर्र................!
किती लवकर संपते ना ही सुट्टी
किती राहिली अजून मस्ती
ठके आता मोठी हो गं बाई
ये शिकवते तुला दोन गोष्टी
मुलगी म्हणून आलीस बाई
असा उनाडपणा बरा नाही
ही बघ वीण, घाल साखळी
भरून टाक सुबक नक्षी
विणताना धर जपून सुई
नाहीतर तुलाच लागेल काही
सुखी सुखी सुखी
राहशील तरच बाई
सुटी सुटी सुटी
मी मे महिन्याची सुट्टी
सुखी सुखी सुखी
मी मे महिन्याच्या सुट्टीतली
स्वाती फडणीस ....................... २००७
|
0
comments
]
0 comments
Post a Comment