स्टेला विहिरीच्या काठाजवळ उभी राहून भेदरलेल्या स्थितीत विहिरीत वाकुन वाकुन पाहत होती. आत काहीच दिसत नव्हतं, ना काही आवाज येत होता ना जाकोब आत असण्याचे काही चिन्ह दिसत होते.

जाकोबने विहिरीत उडी टाकली खरी...

पण हा गेला कुठे?...

स्टेला विहिरीच्या काठावरुन आत वाकुन डोकावून बघत असतांना अचानक तिच्या मागुन एक हात येवून तिच्या खांद्यावर विसावला. स्टेला एकदम घाबरुन जोराने किंकाळली. तिने वळून डोळे घट्ट मिटलेल्या स्थितीत तो हात आपल्यापासून झटकुन दूर सारला.

'' भिवू नकोस ... मीच आहे '' तिला जाकोबचा आवाज आला. तेव्हा कुठे स्टेलाने डोळे उघडले. डोळे विस्फारुन आश्चर्याने ती त्याच्याकडे पहायला लागली. जाकोब तिच्यासमोर उभा होता आणि तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.

'' ओह माय गॉड!... मी किती भिले... माझं तर हृदयच जवळ जवळ थांबायच्या मार्गावर होतं..'' स्टेला उसासा टाकत म्हणाली.

'' बघ मी पुर्णपणे सुरक्षीत आहे... अगदी एकही जखम नाही की साधं खरचटलं सुध्दा नाही'' जाकोब तिच्याकडे पाहत, हसत म्हणाला.

'' होना खरंच की'' स्टेला अजुनही आश्चर्याच्या धक्यातून सावरली नव्हती.

'' आता तर विहिरीत उडी मारण्यासाठी तयार होशील?'' जाकोबने विचारले. .

'' पण खरंच... तु कसा... कुठून बाहेर आलास?'' स्टेलाने अविश्वासाने विचारले.

'' ती एक जादू आहे...'' जाकोबही आता भाव खाण्याच्या अविर्भावात म्हणाला.

'' फक्त माझ्यासोबत विहिरीत उडी तर मार ... सगळं तुला आपोआप कळेल'' तो म्हणाला.

जाकोबने शेवटी तिला उडी मारण्यास मानसिक दृष्ट्या तयार केले आणि तो तिच्या हाताला धरुन तिला विहिरीच्या काठाजवळ घेवून गेला. ती अजुनही थोडीशी अनिच्छेनेच त्याच्यासोबत गेली.

स्टेलाने घट्ट डोळे बंद करुन त्याच्यासोबत विहिरीत उडी मारली. तिच्या किंकाळीचा आवाज ती जशी जशी खाली जात होती तसा तसा कमी होत होता आणि एकाजागी अचानक तिच्या किंकाळीचा आवाज पुर्णपणे नाहिसा झाला.

विहिरीत उडी मारल्यानंतर थोड्याच वेळात स्टेला आणि गिब्सनला आपण अंधारात कुठेतरी जमिनीवर पडलो आहोत असं आढळलं. जाकोबने आणि स्टेलाने ताबडतोब आपापले टॉर्चेस सुरु केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते एका खडकाळ गुहेत जमिनीवर पडलेले आहेत. जाकोबने आपल्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत त्या गुहेत चहूकडे फिरवला. आजुबाजुला खडकाळ भिंती, वरचे डोक्यावरचे रुफही खडकाळ, आणि आजुबाजुला सगळीकडे त्या गुहेत खडकाचे ढीगच्या ढीग विखुरलेले होते.

जसा स्टेलाने आपल्या टॉर्चचा झोत आजुबाजुला फिरवला तशी ती जोरात एकदम किंचाळली. ती भितीने जाकोबला घट्ट बिलगली आणि स्वत:चा चेहरा जेवढा शक्य होईल तेवढा जाकोबच्या छातीशी लपविण्याचा प्रयत्न करु लागली. जाकोबने तिला आपल्या बाहुपाशात धरुन ती जिकडे पाहुन भ्याली तिकडे आपल्या टॉर्चचा प्रकाशझोत टाकला. तोही एक क्षण घाबरला. तिथे अंशत: सडलेलं एक मानवी मृत शरीर पडलेलं होतं. जाकोब तिची आणि स्वत:चीही भिती दूर करण्यासाठी एक उसासा टाकीत म्हणाला, '' ते फक्त एक मेलेलं सडलेलं शरीर आहे.... ही त्या जवळच्या खेड्यातली नाहीशी झालेली आणि पुन्हा कधीही परत न जावू शकलेली लोक आहेत ''

स्टेला आता बऱ्यापैकी सामान्य झाली होती पण तरीही ती जाकोबला अजुनही बिलगलेली होती. जाकोब आपला हात तिच्या डोक्यावरुन फिरवीत तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न करीत होता. ती जेव्हा भानावर आली तेव्हा ती लाजली आणि स्वत:ला त्याच्यापासून वेगळं करीत उठून उभी राहाली. जशी ती उभी राहाली तशी ती किंचाळत पुन्हा जाकोबला बिलगली.

जाकोबने तिला पकडीत विचारले, '' आता काय झालं?''

स्टेलाने आपल्या थरथरत्या बोटाने एकीकडे निर्देश केला. जाकोबने तिकडे टॉर्चचा उजेड टाकून पाहालं तर त्याच्याही शरीरभर एक भितीची लहर पसरली. त्या सडलेल्या मृत शरीराचा मांडीचा भाग एखाद्या हिंस्त्र पशूने खाल्ल्याप्रमाणे कुरतडलेला दिसत होता.

क्रमश:..

0 comments

Post a Comment