जाकोब आणि स्टेला आता त्या अंधाऱ्या गुहेत आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश टाकीत हळू हळू समोर जात होते. अजुनही त्या गुहेत असलेल्या हिंस्त्र पशूच्या अस्तीत्वाची जाणीव आणि भिती त्यांच्या मनात होतीच.
'' पण आपण हे इथे कुठे आहोत?'' स्टेलाने विचारले.
जाकोबने त्याच्या हातातील टॉर्चचा झोत एका खडकावर टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A' असं कोरलेलं होतं.
'' आपण आता एका पुर्णपणे वेगळ्या विश्वात आहोत... फार वर्षापुर्वी एका भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकाने हे जग तयार केलं आहे...'' जाकोब म्हणाला.
स्टेला आश्चर्याने आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती.
'' वेगळं विश्व? ... कसं काय?'' स्टेलाने विचारले.
आता ते बोलता बोलता त्या गुहेत कुठेतरी उपस्थित असलेल्या त्या हिंस्त्र श्वापदाविषयी विसरुन गेलेले दिसत होते.
'' ज्याच्यावर त्याचा विश्वास होता... ते त्यानं बनविलं'' जाकोब म्हणाला.
'' खरंच ... किती अविश्वसनिय वाटते'' स्टेलाच्या तोंडातून त्या गुहेत इकडे तिकडे पाहत असता आश्चर्योद्गार निघाले.
जाकोबने त्याच्या टॉर्चचा प्रकाशझोत त्या गुहेत पुन्हा सगळीकडे फिरविला. प्रकाशझोत फिरवित असतांना त्यांना त्या गुहेत बऱ्याच दुसऱ्या विहिरी दिसल्या. त्याने त्यातल्या एका विहिरीच्या शेजारी असलेल्या खडकावर आपल्या टॉर्चचा प्रकाश टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A1' असे कोरलेले होते. दुसऱ्या एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A2'तर अजुन एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A3' असे लिहिलेले होते.
"" इथे तर बऱ्याच विहिरी दिसताहेत'' स्टेला म्हणाली.
'' त्या नुसत्या विहिरी नाही आहेत ... तर ते अजुन दुसऱ्या विश्वात प्रवेश करण्याचे रस्ते .. म्हणजे अजुन दुसरे ब्लॅक होल्स आहेत...'' जाकोब म्हणाला.
'' ब्लॅकहोल्स... बापरे म्हणजे ब्लॅकहोलच्या आत ब्लॅकहोल...'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.
'' हो बरोबर आहे तुझं ... ब्लॅकहोलच्या आत ब्लॅक होल'' जाकोबने दुजोरा दिला.
'' आणि त्या ब्लॅकहोल्सच्या आत? '' स्टेलाने उत्सुकतेने आणि आश्चर्याने विचारले.
'' त्या ब्लॅकहोल्सच्या आत अजुन ब्लॅक होल्स'' जाकोबने उत्तर दिले.
'' त्या ब्लॅकहोलच्या आतही ब्लॅकहोल! ... खरोखर किती अविश्वसनिय!'' स्टेलाच्या तोंडून निघाले.
'' बाहेरच्या ब्लॅकहोलच्या आत हे सगळे ब्लॅकहोल्स... आणि यांच्या आत अजुन ब्लॅकहोल्स... आणि त्यांच्या आतही ब्लॅकहोल्स ... असं किती वेळा?... त्याला काही तर अंत असेल?'' स्टेलाने विचारले.
'' आहे ना... असं वाटतं की त्या वैज्ञानिकाने A B C D आणि E अश्या पाच लेव्हल्स तयार केलेल्या आहेत... म्हणजे A ब्लॅकहोलच्या आत B ब्लॅकहोल, B ब्लॅकहोल च्या आत C, C च्या आत D आणि D ब्लॅकहोल्सच्या आत E ब्लॅकहोल्स असे...'' जाकोबने तिला सविस्तर माहिती दिली.
'' पाच लेव्हल्स? ... माझा तर विश्वासच बसत नाही आहे... खरं म्हणजे कुणाचाही बसणार नाही'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.
जाकोब आता ब्लॅकहोल 'A3' कडे जायला लागला. स्टेलाही त्याच्या मागोमाग जायला लागली.
'' तुला माहित आहे? ... या ब्लॅकहोलच्या आत एक जादू आहे... तुला बघायची आहे?'' जाकोबने विचारले.
'' जादू... हे सगळं काय जादूपेक्षा कमी आहे?'' स्टेला अजुनही चहूकडे आश्चर्याने पाहत म्हणाली.
जाकोब तिला तिचा हात धरुन 'A3' असं लेबल असलेल्या विहिरीजवळ नेत म्हणाला,
'' हे तर काहीच नाही ... तुला मी याहीपेक्षा मोठी एक जादू दाखवितो''
'A3' विहिरीजवळ आल्यानंतर जाकोब थांबला आणि स्टेलाकडे वळून म्हणाला, '' जरा तुझ्या हातातलं घड्याळ देतेस?''
स्टेलाने जाकोबकडे गोंधळून बघितले.
'' तुला जादू मी दाखविणारच आहे... आधी तुझ्याजवळचं घड्याळ तर दे'' जाकोब तिला गोंधळलेलं पाहून म्हणाला.
स्टेलाने आपल्या मनगटावरचे घड्याळ काढून जाकोबच्या हातात ठेवले.
जाकोबने ते त्याच्या मनगटावरच्या घड्याळासोबत मॅच केले आणि स्टेलाच्या घड्याळीची वेळ ऍडजेस्ट करीत म्हणाला, '' बघ दोन्हीही घडाळ्यात आता बरोबर संध्याकाळचे 7 वाजले आहेत''
स्टेला दोन्हीही घड्याळाकडे आलटून पालटून पाहात गमतीने म्हणाली , '' यात अशी कोणती जादू आहे?''
'' जरा धीर तर धरशील.. अजुन खरी जादू सुरुच व्हायची आहे'' जाकोब तिच्याकडे पाहात, गालातल्या गालात हसत म्हणाला.
तिही त्याच्याकडे पाहून हसत होती.
' ठिक आहे... '' स्टेला गंभीर होण्याचा अविर्भाव करीत म्हणाली.
जाकोब पुन्हा तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि तीही आपला गंभिरपणाचा अविर्भाव सोडून हसायला लागली.
क्रमश:...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment