संध्याकाळची वेळ होती आणि समुद्राच्या काठावर, बिचवर थंड हवा वाहत होती. बरीच प्रेमी जोडपी समुद्राच्या काठावर वातावरणाचा आस्वाद घेत जमली होती. सुझान आणि डॅनियल हातात हात घेवून बिचवर पसरलेल्या रेतीतून चालत होते. दोघंही काही न बोलता समोर दूरवर पाहत होती, जणू आपल्या भावी आयुष्यात डोकावीत असावीत.

'' आता जवळ जवळ पंधरा दिवस झाले आहेत ... माझ्या भावाचा अजूनही काही पत्ता लागत नाही ...'' सुझान गंभिरतेने म्हणाली.

डॅनियल तिच्याकडे बघायला लागला, जणू तिच्या भावना समजून घेत 'मीही तुझ्या दु:खात सहभागी आहे' असं तो म्हणत असावा.

'' सुझान... तू एवढी काळजी का करतेस ... आपण अटोकाट प्रयत्न करीत आहोतच की...'' डॅनियल तिला दिलासा देत म्हणाला.

'' जरी स्टेला नॉर्मल दिसत असली तरी... ती आतून अगदी कोलमडलेली आहे... तिला या स्थितीत मी पाहू शकत नाही ... कधी कधी तर रात्री बेरात्री उठून ती वेड्यासारखी रडत सुटते...'' सुझान म्हणाली.

'' मी तुला आधीपासूनच सांगत होतो...''

सुझानने डॅनियलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहाले.

''.... की तीला एखाद्या चांगल्या मनोचिकित्सकाकडे घेवून जा,... तिला काऊंन्सीलींगची अत्यंत आवश्यकता आहे...'' डॅनियलने आपलं वाक्य पुर्ण केलं.

तेवढ्यात तिथेच बाजुला बसलेल्या एका माणसाने सुझानचं लक्ष आकर्षीत केलं. तो माणूस एका बेंचवर बसून वर्तमान पत्र वाचण्यात गुंग दिसत होता. पण तो वर्तमान पत्र वाचण्याचं नाटक करीत सुझान आणि डॅनियलवर लक्ष ठेवून होता असं तिला जाणवलं.

'' डॅनियल बघ... त्या माणसाकडे तर बघ''

डॅनियलने त्या माणसाकडे बघितले. त्या दोघांची नजरानजर होताच त्या माणसाने पटकन आपलं डोकं पेपरमध्ये खुपसलं.

'' बघ तो वाचण्याचं नाटक करतो आहे खरा .. पण त्याचं पुर्ण लक्ष आपल्याकडे आहे'' सुझान म्हणाली.

'' लंडनच्या प्लेनमध्ये बसून न्यूयार्कला जाण्याचा प्रयत्न करतोय साला'' डॅनियल उपरोधाने म्हणाला.

हे दोघं सारखे त्याच्याकडे पाहून काहीतरी चर्चा करीत आहेत हे लक्षात येताच तो माणूस तिथून उठला आणि काहीही झालं नाही या अविर्भावात तिथून निघून गेला. तो माणूस म्हणजे दूसरं तिसरं कुणी नसून जाकोब होता.

सुर्यास्त झाला होता आणि बिचवर अजुनच अंधारुन आलं होतं. आकाशात समुद्राच्या त्या टोकाला सुर्यास्ताची लाली अजुनही शिल्लक होती. बिचवर एका बाजुला सुझान आणि डॅनियलच्या दोन आकृत्या प्रेमाने एकमेकांना बिलगुन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होत्या.

डॅनियलने सुझानकडे एकटक पाहत म्हटले, '' हनी... मला वाटते ही अगदी योग्य वेळ आहे?''

'' कशाची?'' सुझानने विचारले.

त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले, '' आपण कधी लग्न करणार आहोत?''

सुझान अगदी सहजतेचा आव आणित म्हणाली, '' मला विचार करु दे...''

डॅनियल आश्चर्याने तिच्यापासून वेगळा होत म्हणाला, '' काय? ... म्हणजे?''

'' म्हणजे मला विचार करु दे की किती लवकरात लवकर आपण लग्नबद्ध होवू शकतो...'' सुझान गालातल्या गालात हसत म्हणाली.

'' ओह माय स्वीट सुझी'' आनंदाने तिला आपल्या बाहुपाशात ओढत डॅनियल म्हणाला. तो आता तिच्यावर आवेगयुक्त चुंबनाचा वर्षाव करु लागला होता.

क्रमश:...

0 comments

Post a Comment