पोलिस स्टेशनमध्ये पोलिस ऑफीसर ब्रॅट आणि त्याचा सहकारी समोरा समोर बसले होते. ब्रॅट अस्वस्थ दिसत होता. तो त्याच्या सहकाऱ्याच्या पुढ्यात टेबलवर एक फोटो टाकत त्याच्या खुर्चीवरुन उठला.

'' त्या गुन्ह्याचे शिल्पकार ... हे दोघंजणं आहेत ...'' ब्रॅट म्हणाला.

त्याच्या सहकाऱ्याने तो फोटो न्याहाळून पाहाला. तो स्टेलाचा आणि जाकोबचा कॉफी हाऊसमध्ये कॉफी घेत असतांनाचा फोटो होता.

'' मला शंका होतीच... पण आता खात्री झाली आहे... '' फोटोत जाकोबवर बोट ठेवीत ब्रॅट म्हणाला, '' की या माणसाचाच गिब्सनच्या गायब होण्यामागे हात आहे ''

'' तुम्ही असं कसं... म्हणजे एवढ्या खात्रीने असं कसं म्हणू शकता?'' त्याच्या सहकाऱ्याने विचारले.

ब्रॅटने अस्वस्थतेने त्याच्या टेबलभोवती एक चक्कर मारली आणि मग आपल्या रिकाम्या चेअरच्या मागे चेअरवर रेलून हात ठेवून उभा राहत तो म्हणाला, '' कारण.. त्यांची जवळीक जरा जास्तच वाढतांना दिसत आहे... सिझन नसतांना एखादं फुलाचं झाड बहरावं तसं त्यांचं प्रेम जरा जास्तच बहरतांना दिसत आहे... '' ब्रॅट कडवटपणे म्हणाला.

तिकडे ब्रॅट आणि त्याच्या सहकाऱ्यात चर्चा चालली होती, त्याच वेळी इकडे जाकोब आणि स्टेला गिब्सनचा शोध घेण्यासाठी ब्लॅकहोलमधून त्या खडकाच्या गुहेत पुन्हा शिरले होते. आपआपल्या टॉर्चच्या प्रकाशात ते सोबत सोबत समोर चालले होते.

'' तुला माहित आहे?... गिब्सन या सगळ्या भानगडीत का पडला?'' जाकोबने विचारले.

स्टेलाने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत विचारले, '' कां पडला?''

'' ज्या वैज्ञानिकाने ही छोटी छोटी विश्व तयार केलीत, त्याचा ठाम विश्वास होता की ... जर का असे कृत्रीम विश्व तयार करता येत असतील तर नक्कीच या ब्रम्हांडात अशी खरीखूरी वेगवेगळी विश्व अस्तित्वात असली पाहिजेत... आणि जर आपण जसे या कृत्रीम विश्वात प्रवेश करु शकतो आणि बाहेरही पडू शकतो तसेच आपण खऱ्याखूऱ्या विश्वांमधे सुध्दा प्रवेश करुन बाहेर पडण्याचा काहीतरी रस्ता असला पाहिजे...'' जाकोबने तिला सविस्तर समजावून सांगितले.

'' तो त्यात यशस्वी झाला होता?'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.

'' नाही... असं वाटतं की तो शास्रज्ञ यशस्वी होण्याच्या आधीच गायब झाला... आणि गिब्सन त्याचं अपूर्ण राहीलेलं स्वप्न पुर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागला'' जाकोब म्हणाला.

'' बापरे... म्हणजे गिब्सनही तर नाही ना त्या वैज्ञानिकासारखा गायब झाला?'' स्टेलाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भिती दिसत होती.

जाकोबच्या चेहऱ्यावर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा संभ्रम दिसत होता.

क्रमश:...

0 comments

Post a Comment