जाकोब आणि स्टेला अजुनही 'A' लेव्हलच्या ब्लॅकहोलमध्ये होते.

'' चल आता परत जावूया'' जाकोब स्टेलाला म्हणाला.

जाकोब रस्ता बदलून एकीकडे चालू लागला आणि स्टेलाही रस्ता बदलून त्याच्या सोबत सोबत चालू लागली. जाकोबने चालता चालता आपल्या खिशातला 'तो' टेनिस बॉल बाहेर काढला. त्या बॉलवर काढलेलं मानवी कवटीचं चित्र स्टेलासमोर धरीत तो म्हणाला,

'' बघ हा बॉल आता आपल्याला बाहेर पडायचा रस्ता दाखवेल''

जॉकोबने तो बॉल खडकांच्या उतारावर दोन खडक एकाला एक लागुन तयार झालेल्या खाचेत ठेवला. तो बॉल उतार असल्यामुळे त्या खाचेत खाली घरंगळायला लागला. जाकोब त्या बॉलचा पाठलाग करायला लागला आणि स्टेलाही त्याच्या मागे धावू लागली.

'' आपण जर या बॉलचा पाठलाग केला तरच आपण बाहेर जावू शकू'' जाकोब गमतीने म्हणाला.

शेवटी तो बॉल घरंगळत जावून त्या गुहेतील एका विहिरीत पडला.

'' हिच ती विहिर आहे जिच्यात आपल्याला बाहेर पडण्यासाठी उडी मारावी लागणार आहे'' जाकोब म्हणाला.

जाकोबने स्टेलाचा हात पकडला आणि दोघांनीही त्या विहिरीत उडी मारली. आता स्टेला उडी मारण्यात पटाईत झाली असं दिसत होतं.

जाकोब आणि स्टेला आता त्या वाड्याच्या समोर विहिरीच्या शेजारी जमिनीवर पडले. दोघंही वर आकाशाकडे पाहत उठून उभे राहाले. इतका वेळ आत ब्लॅकहोलमध्ये त्यांना चारही बाजुला खडकाव्यतिरीक्त काहीही दिसलं नव्हतं. आता वर आकाश आणि आजुबाजुला मोकळं मैदान आणि झाडी पाहून त्यांना हायसं वाटलं. जाकोब तिथेच आजुबाजुला जमिनीवर टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी शोधू लागला.

'' काय शोधतोस?'' स्टेलाने विचारले.

तेवढ्यात जाकोबला टॉर्चच्या उजेडात तो जे शोधत होता ते दिसलं असावं. कारण खाली वाकुन त्याने काहीतरी जमिनीवरुन उचललं. तो 'तो' टेनिस बॉल होता, ज्याच्यावर मानवी कवटीचं चित्र काढलेलं होतं.

आता दोघंही सोबत सोबत रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या कारकडे चालू लागले.

'' तर मग... आपण कसे गिब्सनला शोधणार आहोत?'' स्टेला मुळ मुद्यावर आली.

'' त्याचाच तर आपल्याला आता विचार करावा लागणार आहे'' जाकोब आपल्याच धुंदीच चालत म्हणाला.

स्टेला त्याच्यासोबत चालत असतांना आश्चर्याने त्याच्याकडे पहायला लागली. तिला त्याच्या बेफिकीरपणाचं आश्चर्य वाटत होतं.

'' पण एक गोष्ट मला अस्वस्थ करतेय'' स्टेला म्हणाली.

'' कोणती?'' जाकोबने विचारले.

'' तो सडलेला आणि प्राण्यांनी कुरतडलेला माणूस त्या गुहेत जिवंत राहू शकला नाही ... तर गिब्सन जर त्या गुहेत अडकला असेल तर तो कसा काय जिवंत राहू शकतो?'' स्टेलाने जसे स्वत:लाच विचारले.

जाकोब काहीच बोलला नाही. कारण त्याच्याजवळ त्याचे काहीच उत्तर नव्हते.

क्रमश:...

0 comments

Post a Comment