जाकोबने स्टेलाच्या घड्याळाचा आणि त्याच्या घड्याळाचा टाईम जुळवून बरोबर 7 असा केला आणि स्टेलाची घड्याळ तिथेच 'A3'असं ज्या खडकावर कोरलं होतं त्यावर ठेवून दिली. नंतर स्टेलाकडे वळत तो म्हणाला, '' चल आता माझ्याबरोबर या ब्लॅकहोलमध्ये उडी टाक''
जाकोब तिला तिचा हात धरुन त्या विहिरीकडे नेवू लागला तसा स्टेलाने आपला हात सोडवून घेतला.
'' काळजी करु नकोस ... ही उडीही आधीच्या उडीसारखीच आहे...'' जाकोब तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
शेवटी जाकोबने स्टेलाला याही ब्लॅकहोलमध्ये उडी मारण्यास तयार केलं आणि दोघांनीही 'A3'ब्लॅकहोलमध्ये उडी मारली. स्टेलाच्या किंकाळीचा आवाज सुरवातीला हळू हळू कमी झाला आणि मग अचानक बंद झाला.
जाकोब आणि स्टेला दोघंही एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनीवर खाली पडले. हळू हळू ते उठून उभे राहाले. स्टेलाने या गुहेत काहीतरी वेगळे असेल या आशेने आपल्या टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजुला बघितले. जाकोबने उठल्याबरोबर आपल्या टॉर्चचा प्रकाश एका बाजुला टाकला. तिथे एक विहिर होती आणि त्या विहिरीच्या शेजारीच एक खडक होता. त्या खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं.
'' इथे फक्त एकच विहिर?'' स्टेलाने विचारले.
'' नाही अजुन एक आहे तिकडे... B1... का बरं? '' जाकोबने विचारले.
'' नाही ... असंच विचारलं'' स्टेला म्हणाली.
'' तुला विहिरीत उड्या मारण्याची चांगलीच मजा येत आहे असं दिसतं...'' जाकोब तिला चिडवित म्हणाला.
दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात गोड हसले. जाकोब तर मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिच्या सौंदर्याने मोहून जावून तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली.
जाकोब स्टेलाला ज्या विहिरीच्या बाजुला खडकावर 'Exit' असं कोरलेलं होतं तिथे घेवून गेला.
'' ही 'Exit' विहिर आहे, जिच्यातून आपल्याला 'A' लेव्हलला परत जायचं आहे ''
जाकोब आणि स्टेला आता 'Exit'विहिरीच्या अगदी काठावर उडी मारण्याच्या पावित्र्यात उभे होते.
'' असं होवू शकतं का की गिब्सन असाच एखाद्या ब्लॅकहोलमध्ये अडकला असेल?'' स्टेलाने विचारले.
'' हो... होवू शकतं'' जाकोब अगदी सहजतेने म्हणाला.
'' तर मग आपण सगळ्या लेव्हल्सच्या सर्व ब्लॅकहोलमध्ये गिब्सनचा शोध घेतला तर?'' स्टेलाने विचारले.
'' हं... बरोबर आहे तुझं... या परिस्थितीत कुणीही हाच विचार करेल... पण ते जेवढं वाटतं तेवढं सोप काम नाही आहे... ते फार जोखिमीचं काम आहे...''
स्टेला पुढे काही विचारण्याच्या आधीच जाकोबने तिचा हात आपल्या हातात घेवून 'Exit'विहिरीत उडीसुध्दा मारली.
जाकोब आणि स्टेला आता लेव्हल 'A' च्या गुहेत जमिनीवर खाली पडलेले होते. ते एकमेकांकडे बघत, गालातल्या गालात हसत उठून उभे राहाले. उठून उभा राहाल्याबरोबर जाकोब त्या 'A3'असं कोरलेल्या खडकावर ठेवलेल्या स्टेलाच्या घड्याळाजवळ गेला. जाकोबने ते घड्याळ उचललं आणि आपल्या घड्याळाशी जुळवीण्यासाठी जवळ धरीत म्हणाला,
'' बघ तुझ्या घड्याळात 7.15 वाजले आहेत तर माझ्या घड्याळात 8.15 वाजले आहेत...''
'' अरे खरंच की ... पण असं कसं?'' स्टेला त्या घड्याळाकडे बघत आश्चर्याने म्हणाली.
'' या ब्लॅकहोलच्या वेळेचं मोजमाप हे इथल्या मोजमापापेक्षा पुर्णपणे वेगळं आहे... इथले 15 मिनिट म्हणजे या ब्लॅकहोलमधील वेळेच्या 1 तासाबरोबर आहे... '' जाकोब स्पष्टीकरण देत होता.
'' बापरे... खरंच की ...किती अदभूत... अशाने तर माणूस त्याच्या एका जिवनात कितीतरी आयुष्ये जगु शकेल...'' स्टेलाला सगळं कसं विस्मयजनक वाटत होतं.
'' तुला किती आयुष्ये जगावीशी वाटतात?'' जाकोबने विचारले
'' गिब्सनशिवाय कितीही आयुष्ये जगली तरी त्याला गिब्सनसोबत जगलेल्या एका जिवनाची सर येणार नाही'' स्टेला गंभीर होवून म्हणाली.
जाकोबने तिच्याकडे प्रेमाने बघत तिची घड्याळ परत केली.
क्रमश:...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment