स्टेला जेव्हा पुन्हा तिच्या भूतकाळातील विचारांच्या दूनियेतून वर्तमान काळात आली तेव्हा जॉकोबने कार हळू केली होती. त्यांची कार आता एका वाड्याकडे हळू हळू जात होती. स्टेला मंत्रमुग्ध झाल्यासारखी त्या वाड्याकडे बघायला लागली.

अरे हा तर हुबेहुब आपल्या स्वप्नात आलेलाच वाडा...

तिच्या डोळ्या समोरुन गिब्सन त्या वाड्यातून बाहेर येत आहे असे एक स्वप्नातले चित्र तरळून गेले.

'' हा तर तोच वाडा...'' स्टेलाच्या तोंडून आश्चर्याने निघाले.

स्टेलाने आजुबाजुला बघितले. आजुबाजुला शेतात सगळीकडे दाट झाडी आणि गवत वाढलेलं होतं.

'' ... आणि जागाही तिच'' स्टेला पुढे म्हणाली.

जाकोबने वाड्याच्या समोर रस्त्यावर एका कडेला कार थांबवली. स्टेला आणि जाकोब दोघंही कारमधून उतरले. जाकोबने उतरल्याबरोबर कारमधून आपल्या सोबत दोन टॉर्च घेतले. एक त्याने स्वत:जवळ ठेवला तर दुसरा स्टेलाकडे देत म्हणाला, '' हे असूदे... आत आपल्याला लागेल''

जाकोब वाड्याकडे जावू लागला. स्टेला गोंधळलेल्या मनस्थितीत आपल्या हातातला टॉर्च उलटून सूलटून बघत त्याच्या मागे मागे चालत होती.

'' तू इथे आधीही आलेला दिसतोस?'' स्टेलाने तो ज्या आत्मविश्वासाने त्या वाड्याकडे चालत होता त्यावरुन अंदाज बांधीत विचारले.

'' हो... एकदा .. गिब्सन सोबत..'' जाकोब चालता चालता उत्तर दिले.

'' कधी?'' स्टेलाने आश्चर्याने विचारले.

'' जवळ जवळ 15 दिवसांपूर्वी... '' जाकोब सरळ वाड्याकडे न जाता उजवीकडे वळत म्हणाला, '' इकडून ये... अशी ''

तो तिला वाड्याला लागुन उजवीकडे असलेल्या विहिरीजवळ घेवून गेला. विहिरीजवळ येताच पुन्हा स्टेलाला आश्चर्याचा धक्का बसला. पुन्हा तिच्या डोळ्या समोरुन तिच्या स्वप्नातला एक एक प्रसंग चलचित्राप्रमाणे तरळून जावू लागला ज्यात ती एका विहिरीच्या काठावर उभी होती. स्टेलाला गिब्सनच्या फाईलमध्ये ठेवलेलं विहिरीचं चित्रही आठवलं.

जाकोब तिला अजुन विहिरीच्या जवळ घेवून गेला.

'' ही विहिर बऱ्याच दिवसांपासून कुणी वापरत नसावं असं दिसतं..'' स्टेला म्हणाली.'

'' ही विहिर नाही आहे '' जाकोब मधेच म्हणाला.

'' ये ... बघ आत तर बघ..'' जाकोब तिला अजुन पुढे घेवून जात म्हणाला.

स्टेला भितभितच विहिरीच्या काठावर गेली. जॉकोब खाली वाकुन बघत तिलाही खाली बघण्यास मदत करु लागला.

'' तु जरा टॉर्चचा उजेड आत पाडशिल का?'' तिने त्याला सुचविले.

जॉकोबने टॉर्च लावून आत विहिरीत प्रकाशाचा झोत टाकला. स्टेला अजुन वाकुन आत बघु लागली.

'' तुला आत अंधाराशिवाय काहीएक दिसणार नाही... येथील खेडूत या विहिरीला 'ब्लॅक होल' म्हणतात.'' जाकोब म्हणाला.

स्टेलाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारले, '' ब्लॅक होल?... म्हणजे?... असं काय आहे या विहिरीत?''

जॉकोब काहीही उत्तर न देता दोन पावलं मागे आला. स्टेलाही त्याच्या सोबत मागे आली.

'' आता तयार हो ... आपल्याला या विहिरीत उडी मारायची आहे'' जाकोब म्हणाला.

'' काय? ... उडी मारायची आहे?... काहीतरी बोलू नकोस '' स्टेला तो गंमत करीत असावा या अविर्भावाने म्हणाली.

जाकोब तिच्या शेजारी उभा राहून तिच्या होकाराची वाट पाहात तिच्याकडे एकटक पाहू लागला.

'' काहीतरी गंमत करु नकोस...'' ती म्हणाली.

'' मी गंमत नाही करीत आहे... खरंच आपल्याला आत उडी मारायची आहे.. चल लवकर ... माझ्यासोबत उडी मारण्यास तयार हो'' जाकोब गंभीरतेने म्हणाला.

जाकोबने हलकेच तिचा हात धरुन तिला विहिरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. स्टेला पटकन आपला हात सोडवून घेत मागे सरली.

'' नाही .. नाही मी नाही येणार'' ती घाबरुन म्हणाली.

जाकोबने आपलं डोकं खाजवीत थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, '' ठिक आहे ... एक गोष्ट तर करशील?... तु इथे फक्त थांब... मी तुला उडी मारुन दाखवतो...''

जाकोब विहिरीकडे एक एक पाउल टाकीत जावू लागला. स्टेला अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. जाकोबने एकदा वळून तिच्याकडे पाहाले, तिच्याकडे पाहून तो गालातल्या गालात हसला आणि अचानक त्याने विहिरीत उडी मारली.

क्रमश:...

0 comments

Post a Comment