आज चर्चमध्ये सगळी सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची गडबड चालली होती. सुझान नवरीच्या शुभ्र पेहरावात अजुनच खुलून दिसत होती. डॅनियलही त्याच्या कोऱ्या करकरीत सुट - बुटात उमदा दिसत होता. जेव्हा चर्चच्या प्रिस्टने त्यांच्या लग्नाच्या सोहळयाला सुरवात केली दोघांचेही चेहरे भावी आयुष्याच्या स्वप्नाने जणू चमकत होते. त्यांचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक जे चर्चमध्ये जमले होते, त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. त्या गर्दीतच एका जागी जाकोब स्टेलाच्या शेजारी उभा राहाला होता आणि तो समोर चाललेला लग्नसोहळा पाहत होता. त्याच गर्दीत एका कोपऱ्यात पोलिस ऑफीसर ब्रॅट उभा होता आणि तो स्टेला आणि जाकोबच्या हालचाली बारकाईने टिपत होता.

शेवटी प्रिस्टने लग्न सोहळा संपवून त्यांचं लग्न लागल्याचं जाहिर केलं. सुझान आणि डॅनियलने एकमेकांना किस केलं. समोर जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या सदीच्छा आणि आनंद व्यक्त केला.

रात्री सुझान आणि डॅनियलच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी जोरात सुरु होती. पार्टीत एका कोपऱ्यात स्टेला आणि जाकोब काहीतरी चर्चा करीत होते. तेवढ्यात सुझानचं लक्ष त्यांच्याकडे गेलं

सुझानला पोलीस ऑफीसर ब्रॅटचे शब्द आठवले, '' एक्ट्रा मॅरायटल अफेअर''

ब्रॅटला आलेली शंका खरी तर नाही...

तिच्या मनात डोकावून गेलं. वाकडं तोंड करुन हळू आवाजात ती त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या डॅनियलला म्हणाली,

'' या माणसाला इथे कुणी बोलावलं?''

'' नाही ... मी तर नाही बोलावलं'' डॅनियलने खांदे उचकावीत पटकन उत्तर दिलं.

डॅनियल तिच्याकडे एक टक पाहत गमतीने म्हणाला, '' तुला माहीत आहे... मधमाशी ही नेहमी मधाच्या शोधात असते''

'' डॅनियल प्लीज ... माझा मुड खराब नको करुस... ही वेळ अश्या फालतू गमती करण्याची नव्हे'' ती वर वर तर म्हणाली पण तिची स्टेला आणि जाकोबबद्दलची शंका आता दृढ होत चालली होती.

रिसेप्शन पार्टी आता ऐन रंगात आली होती. लोक छोटे छोटे समुह करुन, हातात मद्याचे ग्लासेस घेवून गप्पा करीत होते. लॉनमध्ये मधेच कुण्या एखाद्या गृपमधून जोरात हसण्याचा आवाज येत होता. पोलिस ऑफीसर ब्रॅट संधी साधून स्टेला आणि जाकोबच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या समुहात सामिल झाला.

'' हाय .. मिसेस फर्नांडीस...'' ब्रॅटने स्टेलाला अभिवादन केले.

'' हॅलो...'' स्टेलाने आपल्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करीत प्रतिउत्तर दिले.

'' मी आपल्याला डिस्टर्ब तर करीत नाही?'' तिच्या डोळ्यात पाहत तो खोचकपणे म्हणाला.

'' ओह.. नाही ... बिलकुल नाही'' स्टेला म्हणाली.

स्टेलाने जाकोबला त्याची ओळख करुन दिली,

''जाकोब... मि. ब्रॅट''

दोघांनीही हस्तांदोलन केले.

'' नाईस टू मिट यू'' जाकोब म्हणाला.

'' यू टू'' ब्रॅट त्याचा हात जरा वाजवीपेक्षा जास्त जोराने दाबत म्हणाला.

'' हे पोलीस ऑफीसर आहेत आणि गिब्सनच्या केसवर काम करीत आहेत... आणि हा जाकोब ... गिब्सनचा मित्र'' स्टेलाने दोघांची एकमेकांना थोडक्यात माहिती सांगितली.

'' आपण आधी कधी भेटलो?'' ब्रॅटने जाकोबकडे निरखुन पाहत विचारले.

'' नाही ... मला नाही वाटत... म्हणजे मला तर आठवत नाही '' जाकोब आपल्या स्मरणशक्तीवर जोर देत म्हणाला.

तेवढ्यात सुझान तिथे त्यांच्या मधे घुसली.

'' सुझान आज तु फार सुंदर दिसते आहेस'' ब्रॅटने तिची तारीफ केली.

'' थॅंक यू'' सुझान लाजून म्हणाली.

तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखे करुन ब्रॅटने सुझानला म्हटले, ''सुझान ऍक्चूअली...''

आणि तिला गृपपासून बाजुला घेत गृपला म्हटले, '' ऍक्सूज अस प्लीज''

ब्रॅट सुझानला गृपपासून दूर बाजुला घेवून गेला.

सुझान आणि ब्रॅटची एका कोपऱ्यात काहीतरी कुजबुज चालली होती. तेवढ्यात डॅनियल तिथे आला.

'' आय होप... मी तुम्हाला डिस्टर्ब करीत नाही आहे'' डॅनियल म्हणाला.

'' नाही ... नाही ..'' ब्रॅट म्हणाला.

'' काय आहे ?'' सुझानने विचारले
डॅनियलने कुणीतरी पाठविलेला एक फुलांचा गुच्छ सुझानसमोर धरला. सुझानने तो घेवून त्यात खोसलेले कार्ड बाहेर काढले. त्या कार्डवर लिहिलेलं होतं, '' कॉग्रॅच्यूलेशन्स ऍन्ड हार्टली बेस्ट विशेस... फ्रॉम गिब्सन ... टू माय लव्हली सिस्टर ...'

बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. फक्त एकमेकांकडे आश्चर्याने बघत राहाले.
क्रमश:...





















0 comments

Post a Comment