|
0
comments
]
कालपर्यंत ‘मनसे’ला अनुल्लेखाने टाळणारी ही मंडळी आज ‘मनसे’मुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे गळा काढून सांगत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जात आहे. या मंडळींनी गेल्या काही वर्षांत आपली विश्वासार्हता किती गमावली आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे. एकीकडे शरद पवार यांच्याशी चुंबाचुंबी करायची, तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून लाई चना आणि उत्तर प्रदेश दिन साजरे करायचे, हा मराठी माणसांचा विश्वासघात नाही का?
गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीत ‘मनसे’ने अनेक आंदोलने केली. माझ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठय़ा खाल्ल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला, अनेक केसेस अंगावर घेतल्या, तडीपाऱ्या भोगल्या. माझ्या स्वत:वर ८० हून अधिक केसेस आहेत. हे सारे मराठी माणूस उघडे डोळे ठेवून पाहात होता. माझ्या भाषणातील तसेच कृतीतील तळमळ त्याला दिसत होती. त्यामुळेच त्यांनी ‘मनसे’ला भरभरून मतदान केले. यामध्ये नवमतदारही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे वाढलेल्या जबाबदारीची संपूर्ण जाणीव मला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मी पाहिले. जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडविण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मी तयार केली. आज जो विश्वास आपण दाखवलात, तसाच विश्वास यापुढेही दाखवलात आणि महाराष्ट्राची सत्ता ‘मनसे’च्या हाती दिलीत, तर लोकहितासाठी कठोरपणे राज्यकारभार करून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करून दाखवेन, एवढाच शब्द आज मी आपल्याला देतो.
दिल्लीच्या मनात महाराष्ट्राचा विकास होऊ नये, असेच आहे. किंबहुना, महाराष्ट्राविषयी दिल्ली व उत्तरेतील राजकारण्यांच्या मनात आकस व रागच आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासूनच हा आकस कायम असल्याचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या वेळीच स्पष्ट झालेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यावेळी चिंतामणराव देशमुख यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दाखविलेल्या बाणेदारपणानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक सर्वच नेत्यांनी दिल्लीश्वरांपुढे कायम लोटांगणच घातल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील आजचे राज्यकर्ते तर टीकेपलीकडेच आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचे एक स्वप्न उराशी बाळगून मी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची स्थापना केली
0 comments
Post a Comment