रेशमाच्या लडीतून..
गंधाळली रातराणी.
माती झाली वेडीपिशी..
जरा शिंपताच पाणी.

नव्हाळीची थरथर..
श्वास वादळाच्या खुणा.
मिटलेल्या पाकळीचा..
देह कापे पुन्हा-पुन्हा.

गुढ प्रदेशाच्या वाटा..
अंधारात जाणलेल्या.
झंकारती वेड्यापिश्या..
तारा उभ्या ताणलेल्या.

लक्ष पेटलेल्या लाटा..
घेती कवेत किनारा.
नाचणा~या मयुराचा..
स्पर्श ओठ खोलणारा.

येता एक उंच लाट..
काळ थांबला वाटतो.
शुभ्र चांदण्यांचा खच..
लाल मातीत साठतो.

सारे काही विसरले..
अमृत ते बरसता.
'जगलो' मी असा फक्त..
तोच एक क्षण होता.

0 comments

Post a Comment