एकदा आम्ही दोघं मित्र दुसऱ्या गावाला गेलो. दुसऱ्या गावाला सायकल चालवायची आणि ती पण भाडयाने घेऊन मजा काही औरच असते. तशा दुसऱ्या गावाला करण्यासारख्या बऱ्याच मजा असतात ... आता हे मी तुम्हाला सांगायला नको. कारण त्यात माझाच अडाणीपणा उघडयावर पडायचा. राम्यानं आणि मी एक सायकल भाडयाने घेतली. राम्याला सायकलचं इतकं वेड की कुठ नविन गावाला गेल्यावर हा प्रथम काय बघणार तर इथे सायकलचं दुकान कुठे आहे. एवढच काय त्याला जर कुणी सांगीतलं की अरे काल सायकलवर जातांना माझा ऍक्सीडेंड झाला तर हा लागलीच विचारणार 'सायकलला तर काही झालं नाही ना'' भाडयाच्या सायकलीला कॅरीयर नसते. एकजण दांडयावर बसणार आणि एकजण सायकल चालविणार.
भाडयाची सायकल घेऊन आम्ही खूप फिरलो. तहान लागली म्हणून एका हॉटेलसमोर सायकल लावली. मस्तपैकी चहा प्यायलो. तिथून निघालो तर थेट संध्याकाळ होईपयर्र्ंत फिरलो. मध्येमध्ये खिशातल्या पैशाचा आणि सायकलच्या वापरलेल्या तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर त्या सायकलवाल्याला एकदीवसासाठी का होइना फुकट पंचर काढणारा पोऱ्या मिळायचा. संध्याकाळी सायकल परत करायला गेलो.
'किती झाले ?'' राम्याने सायकलवाल्याच्या ताब्यात सायकल देत विचारले.
सायकलवाला म्हणाला, ''अरे, ही कुणाची आणली तुम्ही... ही माझी सायकल नाही ''
आम्ही तर हबकलोच.
''अरे, तुझं डोकं वगैरे फिरलं की काय ?'' राम्या म्हणाला
''आम्ही आज सकाळी तुझ्याकडून तर घेऊन गेलो होतो''
''ते मला माहीत आहे पण ही कुणाची सायकल आणली तुम्ही?'' सायकलवाला म्हणाला, ''ही विमल सायकल स्टोअर्स वाल्याची त्याचं दुकान स्ट/न्डपाशी आहे माझं बघा कमल सायकल स्टोअर्स'' त्याने बोर्डाकडे हात दाखवीत म्हटले. आम्ही त्याच्या एका खिळयाला लटकुन कसरत करणाऱ्या बोर्डकडे बघीतलं. त्या बोर्डवरची अक्षरं वाचण्यासाठी आम्हाला मानेच्या व्यायामाचे बरेच प्रकार करावे लागले. खरंच ती त्याची सायकल नव्हती.
''आता झाली ना पंचाईत'' मी राम्याला म्हणालो,
''राम्या , आता माझ्या लक्षात आले अरे , आपण हॉटेलवर चहा प्यायलो ना तिथं अदलाबदली झाली बहुतेक आणि ही दुसरी कुणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो''
''पण सायकलला तर कुलूप होतं'' राम्या म्हणाला.
'' तिची चावी हिला लागलेली दिसते असं होतं कधीकधी '' मी म्हटलं.
''याचा अर्थ आपली सायकल कमल सायकलवाल्याकडे गेली असणार'' राम्या म्हणाला
राम्याच्या डोक्यात निव्वळच भेद्र नसावेत हा माझा विश्वास तेव्हा प्रथमच बळावला. पण दुसऱ्या क्षणीच राम्याने एक गहन प्रश्न विचारला आणी तो विश्वास दुबळा पडला. त्यानं विचारलं -
'' आता आपल्याला स्टॅंडवर कमल सायकलवाल्याकडे जावे लागणार... जातांना आपण या त्याच्या सायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ?
आम्ही दोघं पुन्हा सायकलवर बसलो आणि स्ट/न्डवर निघालो कमल सायकलवाल्याकडे.
तिथं गेलो तर ''ही आली ही आली'' म्हणत एका ग्राहकाने आनंदाने आमचं स्वागत केलं.
त्याच्याजवळ आमची सायकल होती. दोन्ही सायकली दिसायला एकदम सेमटूसेम होत्या. जश्या जुळया बहिणी. तो एकटाच होता. आम्ही दोघं होतो.
आम्हा दोघांना पाहून तो चिडतच पण दबक्या आवाजात म्हणाला , ''काय राव, तुम्ही माझी सायकल घेऊन गेलात.'
''तू नेली की आम्ही ?'' संख्याबळाचा फायदा घेत राम्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
''तुमचं बरं तुमचं कुलूप तरी उघडलं माझं तर कुलूपपण उघडलं नाही इतक्या दूरवरून ढुंगण वर करून चालवत आणली हिला '' त्याने परत चिडक्या सुरात म्हटले.
याने ढुंगण वर करून सायकल कशी चालवली असेल याची आम्हाला कल्पना करवेना. माझी तर हिम्मत झाली नाही पण राम्या थेट त्या मानसाच्या पार्श्वभागाकडे अविश्वासाने पहायला लागला.
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे आणि राम्याच्या पाहण्याचा रोख पाहून तो म्हणाला, ''अरे बाबांनो ढुंगण या सायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही म्हणून मागचं चाक उचलून इथपयर्र्ंत ढकलत आणली हिला'' त्याने सायकलचं मागचं चाक उचलून दाखवीत म्हटले.
क्रमशः ...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment