बॅग वगैरे घेवून गिब्सन कामावर जाण्यासाठी निघाला होता. जाता जाता तो दाराजवळ थांबला आणि मागे वळून पाहू लागला. स्टेलाही किचनमधून बाहेर पडून त्याच्याजवळ गेली. त्याच्या अगदी जवळ जावून तिने त्याचा टाय व्यवस्थित केला. दोघंही एकमेकांकडे पाहून गोड हसले. गिब्सन बाहेर कामावर जाण्याआधी हा त्यांचा नेहमीचाच सोहळा असावा असं जाणवत होतं.
'' जेवणासाठी थांबू नकोस ... कामाच्या गडबडीत मी येवू शकेन की नाही मला आत्ताच सांगता येणार नाही'' गिब्सन म्हणाला.
त्यांनी एकमेकांना किस केलं आणि गिब्सन कामावर जाण्यासाठी घराच्या बाहेर पडला.
गिब्सन बाहेर गेल्यानंतर स्टेला जेव्हा आत वळली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचा नवरा एक फाईल विसरला आहे, जी डायनिंग टेबलवर ठेवलेली होती. तिने ती फाईल उचलली आणि ती घराच्या बाहेर झेपावली. गिब्सनजवळ जावून ती फाईल आपल्या पाठीमागे लपवून उभी राहाली.
''तू काही विसरला नाही ?'' स्टेलाने विचारले.
गिब्सन चालता चालता थांबला आणि त्याने गोंधळून मागे वळून पाहाले.
तिने पटकन पाठीमागून फाईल काढून त्याच्या पुढ्यात धरली. त्याने आपल्या विसरभोळेपणाबद्दल गमतीने आपल्या डोक्यात एक चापटी मारली. त्याच्या पुढ्यात धरल्यानंतर स्टेला सहजच ती फाईल चाळू लागली. फाईल चाळता चाळता तिला त्यात एका विहिरीचे काळे स्केच दिसले. तोपर्यंत गिब्सन तिच्याजवळ आला होता. तिला राहून राहून त्या चित्रात काहीतरी गुढ असे जाणवत होते. तिची जिज्ञासा चाळवली गेली होती.
'' हे काय आहे?'' तिने विचारले.
जेव्हा गिब्सनच्या लक्षात आले की ती त्या विहिरीचे चित्र पाहत आहे तो गंभीर झाला. पण लगेचच सामान्य होण्याचा प्रयत्न करीत त्याने म्हटले, '' काही नाही''
बराच वेळ दोघांमधे एक अर्थपूर्ण स्तब्धता आणि शांतता होती.
स्टेलाने जाणले होते की हे काहीतरी महत्वाचे स्केच आहे की जे गिब्सनला आपल्याला सांगायचे नाही.
आणि गिब्सनलाही तिच्या डोक्यात काय चालले होते याचा अंदाज आला होता.
गिब्सन चतूराईने अजून समोर आला, त्याने ती फाईल तिच्या हातातून ओढून घेतली आणि म्हणाला, '' दे लवकर दे... मला आधीच उशीर होतोय''
ती काही बोलायच्या आधीच गिब्सनने तिच्या कपाळाचे चूंबन घेतले आणि तो तिथून भर्रकन निघून गेला सुद्धा.
स्टेला त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहाली.
गिब्सनने आपल्या गाडीत बसून गाडी सुरु केली. त्याने कारच्या खिडकीतून हात बाहेर काढून स्टेलाला ' बाय ' केले
'' बाय हनी... टेक केअर '' स्टेला म्हणेपर्यंत त्याची गाडी भरधाव वेगाने निघून गेली.
गिब्सनची गाडी रस्त्यावर दिसेनाशी झाल्यावर स्टेला परत आपल्या घराकडे वळली. घरात येवून तिने दार आतून बंद करुन घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर अजुनही चिंतेचे भाव दिसत होते.
क्रमश:..
|
0
comments
]
0 comments
Post a Comment