सुझान पोलिस ऑफीसर ब्रॅटला घराच्या बाहेरपर्यंत सोडायला आली. पण बाहेर आल्यावर तो पुन्हा दरवाजाजवळ घूटमळायला लागला. कदाचित त्याला अजुन काही बोलायचे असावे म्हणून सुझान थांबली.

तेवढ्यात घराच्या फाटकासमोर एक बाईक येवून उभी राहाली. गाडीस्वाराने आपली हेलमेट काढली. तो सुझानचा मित्र डॅनियल होता. दारात ब्रॅट आणि सुझानला पाहून तो तिथेच थांबला आणि गाडीवर बसून राहाला. ब्रॅटने पुन्हा आपल्या चिकित्सक नजरेने डॅनियलकडे पाहत विचारले,

'' कोण तो?''

'' माझा मित्र .. डॅनियल'' सुझानने उत्तर दिले.

ब्रॅटने डॅनियलकडे थोड्या विचित्र नजरेने पाहत दबलेल्या आवाजात म्हटले.

'' आय सी... तहानलेला बरोबर विहिरीवर आलेला दिसतो''

'' काय? .. तुम्ही काही म्हणालात?'' सुझानने त्याची अस्पष्ट बडबड ऐकत म्हटले.

'' नाही ... काही नाही'' ब्रॅट पुन्हा सुझानकडे पाहत म्हणाला.

पुन्हा ब्रॅट तिथून निघून जाण्याच्या पावित्र्यात सुझानला म्हणाला,

' स्टेलाची काळजी घे... ती सध्या एका मोठ्या धक्यातून जात आहे... म्हणजे वरुन तसं 'वाटते' तरी...''

ब्रॅटने 'वाटते' या शब्दावर जरा जरुरीपेक्षा जास्त जोर दिलेला कुत्सीत स्वर सुझानच्या लक्षात आला होता.

'' 'वाटते'... म्हणजे तुम्हाला काय सुचवायचं आहे?'' सुझानने प्रतिवाद करीत विचारले.

ब्रॅट गेटकडे निघाला होता तो पुन्हा ब्रेक लागल्यागत थांबला आणि अर्थपूर्णपणे हसत सुझानकडे वळत म्हणाला,

'' ते काय आहे... जगात सर्वात मोठा कलाकार कोण असतो?... माहित आहे?'' ब्रॅटने विचारले.

सुझानने गोंधळून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहाले.

आता हा अजुन काय बरळतो आहे?...

तिला काही समजत नव्हते.

तो काही पावलं गेटकडे चालत जावून पुन्हा थांबला आणि तिच्याकडे वळून म्हणाला,

'' गुन्हेगार हा जगात सर्वात मोठा कलाकार असतो..''

ती काही बोलायच्या आधीच तो भराभर पावले टाकीत गेटच्या बाहेर सुद्धा गेला होता.

गेटच्या बाहेर गेल्यावर तो पुन्हा बाईकवर बसून तिथेच थांबलेल्या डॅनियलजवळ थांबला. त्याच्या अगदी जवळ जावून त्याने त्याच्या खांद्यावर थोपटल्या सारखे केले आणि त्याची कॉलर व्यवस्थित केल्यासारखी केली.

डॅनियलला हा काय प्रकार आहे काही समजत नव्हते. तो फक्त गोंधळून त्याच्याकडे पाहत होता.

एकदम पुन्हा ब्रॅट वळून भराभर आपले पावलं टाकीत आपल्या जिपकडे निघाला. डॅनियल अजुनही गोंधळून ब्रॅटच्या जिपकडे जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

ब्रॅटची जिप सुरु झाली आणि वेगात तिथून निघून गेली. डॅनियल आपल्या चेहऱ्यासमोर आलेली धूळ आणि धूर हाताने टाळण्याचा प्रयत्न करीत त्या जाणाऱ्या जिपला बघू लागला.

क्रमश:...

0 comments

Post a Comment