तो वाडा काही गिब्सनला स्वस्थ बसू देत नव्हता. कारण आज रात्री पुन्हा गिब्सन त्या वाड्यात आला होता. वाड्याच्या आतल्या भागात त्याला एका जागी एक मोठा दगड दिसला. त्याने काही क्षण त्या दगडाकडे आणि त्या दगडाच्या आजुबाजुला निरखुन बघितले आणि तो पुर्ण ताकदीनिशी त्या दगडाला तिथून हलवायला लागला. जसा तो दगड तिथून थोडा हलला त्याला दगडाच्या मागे पोकळी दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. तो दगड पुर्णपणे तिथून हलविताच त्याला तिथे आत जाणारा एक काळा कुट्ट अंधाराने भरलेला रस्ता दिसला. त्याने त्याच्याजवळच्या टॉर्चने आत प्रकाशाचा झोत टाकला. आत एक गुढ आणि जुनी गुफा दिसू लागली. त्याच्या जवळच्या टॉर्चचा प्रकाशाचा झोत टाकत तो आत त्या गुहेत शिरू लागला.

गुहेच्या आत शिरताच त्याने त्याच्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत आजुबाजुला फिरवला. त्या गुहेत त्याला वेगवेगळी भौतिकशास्त्राच्या प्रयोगाची उपकरणं अस्तव्यस्त पसरलेली आणि धूळीने माखलेल्या परिस्थीतीत दिसू लागली. गुहेत सर्वत्र कागदाचे तुकडे आणि कोळशाने काठलेली चित्रंही इकडे तिकडे पसरलेली होती. गुहेच्या एका कोपऱ्यात त्याला एक वाळूचे घड्याळ ठेवलेले दिसले, ज्यात वाळू अगदी हळू गतिने अजुनही वाहत होती. तिथे ठेवलेल्या उपकरणांवर साचलेल्या धूळीवरुन उघड होते की बऱ्याच दिवसांपासून त्या उपकरणांना कुणी वापरले नव्हते किंवा स्पर्शही केला नव्हता. गिब्सन त्या गुहेत मधे येणारे अडथळे टाळत काळजीपुर्वक एका बाजुकडून दुसऱ्या बाजुला गेला.

गिब्सन त्या गुहेच्या एका भिंतीवर टार्चच्या प्रकाशझोतात काहीतरी निरखून पाहू लागला. त्याला त्या धुळीने माखलेल्या भिंतीवर पुसटसे काहीतरी लिहिलेले दिसले. धूळीमूळे काय लिहिले ते ओळखू येत नव्हते. गिब्सनने तेथील भिंतीवरची धूळ पुसली. भिंतीवर काही अक्षरं दिसू लागली, लिहिलेलं होतं, '' टाईम इज मनी'. त्याच्या समोरही काहीतरी लिहिलेलं अस्पष्ट दिसत होतं म्हणून गिब्सनने भिंतीवरील पुढील भागही साफ करुन तेथील धूळ हटवली. समोर लिहिलेलं होतं,'' ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट ''

'' टाईम इज मनी ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट'' गिब्सनला पुर्ण वाक्यात काहीतरी अर्थ दडलेला दिसत होता.

गिब्सन ते भिंतीवर लिहिलेलं वाचल्यानंतर दुसरीकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात त्याच्या डोक्यावर काहीतरी पडलं. घाबरुन तो दोन पाऊल मागे सरला. टॉर्चच्या उजेडात त्याने बघितले की जुन्या, कुठे कुठे फाटलेल्या कागदांचा गठ्ठा जमिनीवर पडला होता. ते जुने कागद जिर्ण होवून पिवळे पिवळे झाले होते. त्याने तो गठ्ठा उचलला आणि तो एक एक कागद चाळून पाहू लागला. त्या कागदांवर काही गणिती सुत्र लिहिलेली होती तर कुठे कुठे काही आकृत्या काढलेल्या होत्या. गिब्सन ते कागद आता काळजीपुर्वक वाचू लागला. हळू हळू त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचा आनंद पसरु लागला. जसा जसा तो पुढे वाचू लागला त्याचा चेहरा अजुनच प्रफुल्लीत दिसायला लागला. हळू हळू त्याच्या चेहरा एवढा जास्त आनंदी दिसायला लागला की तो वेडा झाला की काय अशी कुणाला शंका यावी.

गिब्सन त्या विहिरीच्या अगदी काठावर उभा होता. आपण त्या विहिरीत पडू किंवा काय अशी भिती त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हती. त्याच्या हातात अजुनही तो कागदांचा गठ्ठा होता. त्याने अजुन समोर जावून एकदा विहिरीत डोकावून बघितले.

दोन पाऊल मागे येवून पुन्हा तो टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या हातातली कागदपत्रे चाळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते वेडसर हास्य झळकायला लागलं.

क्रमश:..

0 comments

Post a Comment