सकाळचा चहा घेत गिब्सन ब्रायनच्या घरी त्याच्या समोर बसला होता. ब्रायनच्या डोक्याला बांधलेल्या बॅन्डेजकडे पाहून गिब्सनला रात्रीच्या त्या प्रसंगाची आठवण झाली. त्याला हसूही येत होतं आणि ब्रायनच्या डोक्याला चांगलाच फटका बसला होता त्याचं वाईटही वाटत होतं. आलेलं हसू चेहऱ्यावर दिसू न देता त्याने गंभीर होवून ब्रायनला विचारले, '' आता बरं आहे ना?''

ब्रायनने फक्त होकारार्थी मान हलवली.

थोडा वेळ काहीच न बोलता शांततेत गेला.

'' तु कधी कुणाला त्या वाड्यात राहतांना पाहालं आहे?'' गिब्सनने विचारले.

त्याच्या डोक्यात अजुनही त्या वाड्याचेच विचार घोंगावत होते.

'' नाही... पण लोक सांगतात की एक म्हातारा त्या वाड्यात राहात होता... म्हणजे खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे...'' ब्रायन सांगु लागला.

'' ते सांगतात की खेड्यातला कुणाशीच तो कधी बोलत नसे...कुणी म्हणायचं तो शहरातून आला आहे... पण नक्की कुणालाच काही माहित नव्हतं...'' ब्रायनने पुढे माहिती पुरवली.

'' मग आता कुठाय तो?'' गिब्सनने विचारले.

'' नाही ... कुणालाच माहित नाही... माझे वडील सांगायचे की तो भूत असावा... कारण तो गायब झाला खरा पण नंतर कुणालाच त्याचं शव किंवा काहीच मिळालं नाही...'' ब्रायन म्हणाला.

'' भूत? ... तुझा भूतांवर विश्वास आहे?'' गिब्सनने विचारले.

'' मला वाटते तोही असाच त्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाला असावा'' ब्रायन म्हणाला.

गिब्सन पुन्हा आपल्या विचारांच्या दूनियेत निघून गेला आणि काहीतरी लक्षात आल्यासारखं करुन त्याने विचारले , '' ती विहिर कधी खोदली किंवा बांधली असेल याचा काही अंदाज आहे तुला?''

'' लोक सांगतात की तो आला आणि त्याने स्वत: एकट्याने ती विहिर खणली... त्याच्या विक्षीप्त वागण्यामुळे लोक त्याला घाबरायचे...'' ब्रायन म्हणाला.

तेवढ्यात ब्रायनचा साधारणत: सात-आठ वर्षाचा मुलगा फ्रॅंक बाहेरुन धावतच तिथे आला. पोरगा रंगाने काळा जरी असला तरी चेहऱ्याने फारच गोड होता. गिब्सनने मधे येवून त्याला अडविले,

'' हॅलो क्यूटी ... काय नाव तुझं?''

त्या पोराने लागलीच आपल्या वडीलाकडे पाहाले. त्याच्या वडीलाने खुणेनेच त्याला संमती दिली. त्या पोराने लाजत लाजत इकडे तिकडे पाहत हळू आवाजात आपले नाव सांगितले, '' फ्रॅंक ''

'' अरे वा... चांगलं नाव आहे'' गिब्सन त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला.

आता गिब्सनने आपल्या पॅंन्टच्या खिशातून 'तो' टेनिसचा चेंडू काढला आणि फ्रॅंकसमोर धरला.

'' फ्रॅंक ... हा चेंडू तुला कुठे सापडला बेटा?'' गिब्सनने विचारले.

अचानक त्या पोराच्या चेहऱ्यावर भितीचं सावट दिसायला लागलं. त्याने घाबरुन आपल्या वडीलांकडे बघितले.

'' भिऊ नकोस ...तुझे वडील काही करणार नाहीत'' गिब्सनने त्याची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.

'' सांगना ...ते काका काय विचारताहेत... कुठे सापडला तो बॉल?'' ब्रायनने त्याला रागावल्यासारखं करीत कडक आवाजात विचारले.

गिब्सनने इशाऱ्यानेच ब्रायनला शांत राहण्यास सांगितले. तो फ्रॅंकजवळ गेला आणि त्याच्या समोर उभा राहाला. हळूच फ्रॅंकच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याच्या समोर गुढग्यावर बसला. गिब्सनने त्याच्या निरागस डोळ्यात बघितले, त्याचे छोटे छोटे हात आपल्या हातात घेवून थोपटत त्याला विचारले,

'' तू मला त्या जागेवर नेवू शकतोस का?''

फ्रॅंक जरी भ्यालेला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर होकार दिसत होता.

क्रमश:..

0 comments

Post a Comment