स्टेलाच्या घराच्या गेटसमोर डॅनियल अजुनही सुझानची त्याच्या बाईकवर बसुन वाट पाहत होता. डॅनियल कॉलेजमध्ये जाणारा एक एकविस बाविस वर्षाचा फॅशनेबल तरुण होता. तो आपली गाडी सारखी रेज करीत होता आणि गाडीच्या सायलेन्सरमधून सारखा धूर बाहेर पडत होता. तेवढ्यात डॅनियलला घाईघाईने घराच्या बाहेर येत असलेली सुझान दिसली. त्याने तिच्याकडे पाहताच त्यांची नजरानजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात गोड हसले.

सुझान जवळ येताच डॅनियलने हेलमेट डोक्यात घालून बकल लावलं आणि डावा पाय ब्रेकवर जोरात दाबून ऍक्सीलेटर जोरात वाढवलं. जशी सुझान त्याच्या मागे बाईकवर बसायला गेली डॅनियलने गियर टाकला आणि बेकवरचा पाय वर करीत ब्रेक सोडला.

'' थांब .. .थांब ... तू वेडा आहेस की काय... मला आधी व्यवस्थीत बसू तर देशील'' सुझान रागाने म्हणाली.

डॅनियलने मागे वळून बघितले आणि एकदम बाईकचा ब्रेक दाबला. सुझानची त्याच्यासोबत टक्कर होवून तिच्या पुढच्या दाताला त्याची हेलमेट लागली.

'' उं...'' वेदनेने विव्हळत तिने आपला दात हात लावून बघितला.

'' ओह ... आय ऍम सॉरी'' डॅनियल क्षमा याचना करीत म्हणाला.

'' तुला माहित आहे ... तु केवढा वेंधळा आहेस... मला तर कधी कधी आश्चर्य वाटते की मी तुझ्या प्रेमात पडलीच कशी...'' सुझान चिडून म्हणाली.

'' आय ऍम सो सॉरी...'' तो राहून राहून तिची माफी मागत होता.

आता कुठे सुझान त्याच्या मागे बाईकवर व्यवस्थित बसली, तिने आपल्या खांद्यावरुन तिरकं बघत एक नजर आपल्या घराकडे टाकली. डॅनियल तिच्या इशाऱ्याची वाट पहायला लागला. तिही त्याची गाडी पुढे नेण्याची वाट पाहू लागली. शेवटी तिने त्याच्या खांद्यावर चापटी मारीत म्हटले, '' मि. डॅनियल कॅन्टोर''

डॅनियलने मागे वळून बघितले, '' काय?''

'' मला वाटते .. आता निघायला हरकत नाही डियर..'' ती उपरोधाने म्हणाली.

डॅनियलने गियर बदलवला आणि ब्रेक सोडत गाडी रस्त्यावर वेगात दौडविली.

जेव्हा गाडी वेगाने पण संथ चालू लागली, डॅनियलने आपल्या डोळ्यांच्या कडांतून सुझानकडे एक कटाक्ष टाकला. पुन्हा दोघं एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात गोड हसले. सुझान हळूच त्याच्या अगदी जवळ सरकली आणि तिने त्याला मागुन घट्ट पकडले.

क्रमश:...

0 comments

Post a Comment