रस्त्यावर वेगाने एक कार धावत होती. त्या कारच्या ड्रायव्हींग सीटवर जाकोब बसला होता आणि त्याच्या शेजारच्या सिटवर स्टेला बसलेली होती. ट्रॅफीकमधून रस्ता काढीत, वळणे घेत कार धावू लागली. कारच्या काचातून समोर रस्त्यावर बघता बघता स्टेलाने एक दृष्टीक्षेप जाकोबकडे टाकला. त्यानेही कार चालविता चालविता तिच्याकडे बघितले. त्याच्याशी नजरा नजर होताच पटकन तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळविली आणि पुन्हा ती काचातून समोर रस्त्यावर बघायला लागली. समोर बघता बघता तिला एवढ्यातच घडलेल्या काही घटना एक एक करुन आठवायला लागल्या... ....
गिब्सन आपली पत्नी स्टेला आणि बहिण सुझानसोबत आज सकाळी डायनींग टेबलवर नाश्ता घेत होता. अर्धवट संपलेल्या नाश्त्याच्या प्लेट्स त्यांच्यासमोर डायनींग टेबलवर ठेवलेल्या होत्या. गिब्सन साधारण तिशीतला, कुरुळे आणि थोडे लांब केस, आणि त्याच्या स्थीर डोळ्यावरुन त्याची प्रगल्भता आणि बुध्दीमता दिसत होती. त्याच्या गंभीर आणि स्थिर व्यक्तीमत्वावरुन त्याने वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि अभ्यास सहज जाणवत होता. तो त्याच्या हातातली फाईल चाळत असतांना मधे मधे चमचाने नाश्त्याचा एक एक घास घेत होता. स्टेलाला त्याची ही काही खातांना वाचण्याची सवय चांगलीच अंगवळणी पडलेली दिसत होती. कारण ती त्याला काहीही आक्षेप न घेता आपला नाश्ता खाण्यात गुंगलेली होती. दुसरीकडे सुझानही जरी वरकरणी नाश्ता खात असली तरी तीही आपल्या विचारात गुंग दिसत होती.
आपली फाईल चाळता चाळता आणि मध्ये मध्ये नाश्ताचे घास घेत गिब्सनने एक नजर त्याच्या बहिणीकडे, सुझानकडे टाकली.
'' काय कॉलेज कसं काय आहे?'' गिब्सनने तिला विचारले.
सुझान अजुनही आपल्याच विचारात मग्न होती. या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नाने ती तिच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली आणि गोंधळल्या मनस्थितीत इकडे तिकडे पाहू लागली. ती आपल्या चेहऱ्यावर आलेले गोंधळलेले भाव लपविण्याचा प्रयत्न करु लागली. पण ते भाव लपविण्यासाठी काय करावे तिला काही समजत नव्हते, तीने पटकन एक नाश्त्याचा घास घेतला आणि तो ती पटापट खात गिळण्याचा प्रयत्न करु लागली.
'' अं.. हो.. म्हणजे चांगलच आहे '' तिने घशात घास अटकल्यागत उत्तर दिले.
तिची वहिणी स्टेला तिची ही गोंधळलेली मनस्थिती पाहून आपलं हंसू आवरु शकली नाही.
गिब्सनने एक नजर स्टेलाकडे टाकली आणि नंतर सुझानकडे पाहत तो आपली फाईल चाळण्यात पुन्हा मग्न झाला.
'' तो तुला कॉलेजबद्दल विचारतोय... ब्रेकफास्टबद्दल नाही'' स्टेला सुझानची फिरकी घेत तिला चिडविल्याप्रमाणे म्हणाली.
'' हो मीही ब्रेकफास्टबद्दलच... नाही म्हणजे कॉलेजबद्दलच बोलते'' सुझान स्वत:ला सावरुन घेण्याच्या प्रयत्नात म्हणाली.
पुन्हा स्टेला जोराने हसली.
'' तुझ्या चेहऱ्यावरुन ते स्पष्टच दिसत आहे की तु कश्याबद्दल बोलत आहे'' स्टेला अजुनही तिला सोडायला तयार नव्हती.
सुझानने आपल्या भावाकडे पाहाले, तो अजुनही आपली फाईल वाचण्यात गुंग होता. तो आपल्याकडे पाहत नसल्याची खात्री होताच सुझानने मोठे डोळे करुन राग आल्याचा खोटा खोटा अविर्भाव करीत स्टेलाकडे पाहाले आणि तोंडावर बोट ठेवून गमतीने 'चूप राहण्याचं काय घेशील' असा अविर्भाव केला.
तेवढ्यात बाहेरुन सारखा एका बाईकच्या हॉर्नचा आवाज येवू लागला. सुझानने चटकन खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर तिचा मित्र डॅनियल गेटजवळ बाईकवर बसून खिडकीकडे पाहत तिची वाट पाहत होता. दोघांची नजरानजर होताच त्याने हॉर्न वाजवणे बंद केले.
स्टेलाने सुझानकडे पाहत गमतीने गालातल्या गालात हसत एक डोळा बारीक म्हटले, '' सुझान तुला नाही वाटत की तुला उशीर होत आहे
'' सुझान अर्धवट झालेला नाश्ता तसाच डायनींग टेबलवर सोडत आपल्या जागेवरुन उठली आणि आपल्या गालावर आलेली लाली लपविण्याचा प्रयत्न करीत कॉलेजला जाण्याची घाई करु लागली.
सुझानने आपली पुस्तकं आणि बॅग उचलली आणि घाईघाईने ती समोरच्या दाराकडे झेपावली.
'' बाय स्टेला ... बाय ब्रदर'' ती जाता जाता म्हणाली.
गिब्सन आपली फाईल वाचता वाचता आपल्या डोळ्याच्या कडांतून तिच्याकडे एक नजर टाकत म्हणाला, '' हं... बाय..''
'' बाय हनी ... टेक केअर '' स्टेला गालातल्या गालात हसत तिला चिडविल्यासारखे म्हणाली.
सुझान जाता जाता एकदम दारात थांबली, आणि स्टेलाकडे बघत, गालातल्या गालात हसत, तिने एक मुक्का मारण्याचा 'तुला नंतर बघून घेईन' असा अविर्भाव केला आणि पुन्हा पटकन गर्रकन वळत ती घाईघाईने निघून गेली.
स्टेला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अजुनही गालातल्या गालात हसत होती.
क्रमश:...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment