थोडा वेळ तो वाडा, ती विहिर आणि आजुबाजुचा परीसर पाहिल्यानंतर गिब्सन आपल्या कारजवळ परत आला. कारजवळ आल्यानंतर पुन्हा तंद्री लागल्यागत थोडावेळ त्या वाड्याकडे पाहत राहाला. थोड्यावेळाने भानावर येत त्याने आजुबाजुला बघितले. रस्त्याच्या दोनही टोकांकडे त्या वाड्यापासून दूर दूर पर्यंत चिटपाखरुही फिरकतांना दिसत नव्हतं. तिथून दोन एक मैल दूर एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेली एक वस्ती बघून गिब्सनला हायसं वाटलं.
गिब्सन कारमध्ये बसला आणि गाडी सुरु करुन तिथून समोर त्या वस्तीकडे त्याने आपली गाडी दौडविली. जशी त्याची कार तिथून निघून गेली एका झूडपाच्या मागे लपलेले चार पोरं सायमन, रेयान, माल्कम आणि अब्राहम बाहेर आले.
'' ए चला तो गेला आहे '' अब्राहम म्हणाला.
'' कोण होता तो?'' सायमनने विचारले.
ते सगळेजण त्या जुन्या वाड्याकडे जायला लागले.
'' मला काय माहित ... असेल कुणीतरी नविन वाटसरु..'' माल्कम म्हणाला.
'' ए माझ्या आईने या भागात यायला मनाई केली आहे'' त्यातला सायमन दुसऱ्यांना सावध करण्याच्या उद्देशाने म्हणाला.
'' अरे... मोठी माणसं नेहमीच आपल्याला भिती दाखवित असतात'' अब्राहम बेफिकीरपणे त्याची काळजी दूर करण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाला.
'' नाही ... मी एकलं आहे की त्या ब्लॅक होलमध्ये भूत आहे म्हणे'' रेयान म्हणाला.
'' अरे ... आपण त्या ब्लॅक होलकडे जाणार नाही आहोत'' माल्कमने त्याची समजूत घातली.
'' ब्लॅक होल?'' च्याच्यातल्या लहान असलेल्या सायमनने विचारले.
'' तुला माहित नाही?... लोक त्या विहिरीला ब्लॅक होल म्हणतात'' माल्कमने त्याला आश्चर्याने विचारले.
'' का? ... का म्हणतात?'' सायमनने विचारले.
त्यातल्या सगळ्यात मोठ्या अब्राहमने सायमनच्या ढुंगणावर चापटी मारीत म्हटले, '' कारण... सगळे 'होल' ब्लॅक नसतात म्हणून
''रेयान, माल्कम आणि अब्राहम त्याची उडवल्यागत हसायला लागले. सायमनही काही न समजुन हसायला लागला.
पोरं वाड्याच्या समोर असलेल्या मैदानात चेंडू खेळू लागली. अब्राहमच्या हातात बॉल होता त्याने तो दुसऱ्या पोरांना फेकून मारण्याच्या आधी त्या चेंडूला निरखुन पाहाले. त्या चेंडूवर कुणीतरी काळ्या पेनने मानवी कवटीचे भयानक चित्र काढलेले होते.
त्यांच्यापैकीच कुण्या पोराचे ते काम असावे...
अब्राहम आता कोण पोरगा त्याच्यापासून सगळ्यात जवळ आहे हे बघायला लागला. रेयान त्याला त्यातल्या त्यात जवळ वाटला म्हणून तो त्याच्या मागे जोराने धावायला लागला. धावता धावता त्याने जोराने तो चेंडू समोर धावणाऱ्या रेयानच्या पाठीत मारला. रेयानच्या पाठीत बरोबर मधोमध तो लागला.
'उं..क' रेयानच्या तोंडून आवाज आला. कारण तो चेंडू बराच कडक असल्यामुळे त्याला जोरात लागला असावा.
तो चेंडू त्याच्या पाठीत लागून उडाला आणि एका दिशेने घरंगळत टप्पे खात जावू लागला. त्यांच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या एका पोराजवळ, माल्कमजवळ तो चेंडू पोहोचला. त्याने धावत जावून तो उचलला आणि तो आता कोण जवळ आहे हा अंदाज घेवू लागला. त्याच्या जवळ आणि आवाक्यात असलेली पोरं आता दूर दूर पळायला लागली. त्यातल्या एका जणाला, अब्राहमला हेरुन तो त्याचा पाठलाग करायला लागला. पाठलाग करता करता त्याने तो चेंडू समोर धावणाऱ्या अब्राहमच्या पाठीत जोराने फेकून मारला. पण अब्राहम चपळतेने खाली वाकला आणि त्याच्या चेंडूचा नेम हूकला.
बॉल आता दुसऱ्या एका पोराच्या, सायमनच्या समोरून घरंगळत, टप्पे खात समोर समोर जावू लागला. यावेळी मारतांना माल्कमचा नेम चुकल्यामुळे चेंडूला बरीच गती होती. सायमन त्या चेंडूमागे धावायला लागला. त्या चेंडूमध्ये एवढी गती होती की तो चेंडू टप्पे खात खात त्या ब्लॅकहोलच्या सभोवताली असलेल्या खडकाच्या ढिगाऱ्यावर जावून पोहोचला आणि खाली विहिरीच्या दिशेने घरंगळायला लागला. सायमन त्या चेंडूला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करु लागला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो चेंडू घरंगळत जावून त्या विहिरीत पडलाच. पण हे काय? त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन सायमनची पकड निसटली आणि तोही त्या चेंडूमागे विहिरीत घरंगळायला लागला.
बाकीची पोरं विहिरीभोवती जमा झाली आणि सायमनला मदत करण्याचा प्रयत्न करु लागली. सायमन त्या विहिरीच्या काठावर एका खडकाचा आधार घेत एक पाय विहिरीत तर दुसरा पाय वर खडकावर एखादा आधार शोधीत अशा परीस्थीत लोंबकळत होता. पोरं गोंधळली, घाबरली, त्यांना काय करावं काही कळेना. ती एकमेकांचा हात पकडून त्याची साखळी तयार करुन सायमनजवळ पोहचण्याचा प्रयत्न करु लागली. साखळीत सगळ्यात शेवटी माल्कम सायमनच्या जवळ पोहोचणार एवढ्यात सायमनने ज्या खडकाला पकडले होते तोच खडक निखळून बाहेर आला आणि तो खडक आणि सायमन विहिरीत पडले. पडतांना त्याची एक मोठी किंकाळी वातावरणात गुंजली आणि तो एखाद्या राक्षसाच्या तोंडात गुडूप व्हावा तशी एकदम बंद झाली.
क्रमश:...
|
0
comments
]
0 comments
Post a Comment